Elon Musk Starlink India : सध्या एक वाद तुफान पेटलाय. एका बाजूला आहेत आपले मुंबईचे, म्हणजेच अख्ख्या भारताचे रिलायन्स किंग मुकेशभाई अंबानी आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेतून आलेले, ट्विटरचे मालक आणि जगातले सगळ्यात श्रीमंत माणूस इलॉन मस्क. या दोघांमध्ये सध्या जुंपलीये…. ही लढाई आहे तुमच्या-आमच्या मोबाईलमध्ये, घरामधल्या कम्प्युटरमध्ये येणाऱ्या इंटरनेटची. थेट अंतराळातून इंटरनेट पुरवण्याच्या या धंद्यामध्ये सध्या अब्जाधीशांचं महाभारत सुरू झालंय. हा वाद नेमका काय आहे, इलॉन मस्कने असं काय ट्विट केलंय की ज्याच्यामुळे जगभरात सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात आणि या वादाचा तुमच्या-आमच्या खिशावर काय परिणाम होणार, हे सगळं समजून घेणार आहोत….
इलॉन मस्क यांच्या पोस्टमुळे चर्चा का सुरू झाली?
इलॉन मस्क ( Elon Musk ) भाऊंचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, ज्याचं नाव आहे स्टारलिंक. या स्टारलिंकच्या माध्यमातून मस्कला काय करायचंय? तर अंतराळात हजारो लहान-लहान सॅटेलाईट म्हणजेच उपग्रह सोडायचे आणि त्या उपग्रहांच्या मदतीने पृथ्वीवरच्या अगदी दुर्गम भागात, जिथे साधा मोबाईलचा टॉवरही उभा राहू शकत नाही, अशा डोंगराळ, जंगलाच्या किंवा अगदी वाळवंटाच्या भागातही हाय-स्पीड इंटरनेट द्यायचं. मस्क गेल्या ५-६ वर्षांपासून भारताच्या दारात उभा आहे, लायसन्स मागतोय. पण भारतात परवाना मिळणं काही सोपं काम नाही. भारताचे स्वतःचे कायदे आहेत, सुरक्षेचे नियम आहेत. मस्कने सर्व कागदपत्रं दिली, परवान्यासाठी अर्ज केला, पण फाईल काही पुढे सरकेना.
आता एवढा मोठा जगातला श्रीमंत माणूस, ज्याच्या एका ट्विटवर शेअर मार्केट वर-खाली होतं, त्याचा संयम सुटला. मस्कने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं की, आदरणीय पंतप्रधान अंबानी, भारताचे खरे सर्वेसर्वा तुम्हीच आहात हे माझ्या लक्षात न आल्याबद्दल कृपया माझी नम्र माफी स्वीकारावी. स्वाभाविकच, भारतातील महान जनतेचे मक्तेदारीद्वारे शोषण करणे तुम्हाला अधिक पसंत असेल; तरीही, ‘स्टारलिंक’ला स्पर्धा करण्याची संधी देण्याचा तुम्ही विचार कराल का? इतर सर्व देशांप्रमाणेच भारतातही असे अनेक भाग आहेत जिथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे मुलांना शिक्षणाची संधी मिळत नाही आणि लघुउद्योजकांना जागतिक बाजारपेठेत आपला माल विकता येत नाही. ‘स्टारलिंक’मुळे त्यांचे जीवन नक्कीच अधिक चांगले होऊ शकेल.
हेही वाचा : अमेरिकेचा भारतीय IT कंपन्यांना मोठा झटका! TCS, Infosysसह 8 कंपन्यांच्या Green Card प्रक्रियेला ब्रेक
Starlink आणि Jio यांच्यातील वादाचं कारण काय? ( Starlink Project )
आता विचार करा, मस्कने थेट मुकेश अंबानींचं नाव घेऊन हा थेट हल्ला चढवला. जसा हा ट्विट आला, तसा भारतात एकच खळबळ उडाली. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर मस्कच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं की, “वेलकम टू इंडिया इलॉन भाऊ! तुम्ही आतापर्यंत फक्त अंबानींनाच पाहिलंय, अजून तुम्ही भारतातल्या दुसऱ्या मोठ्या भावाला म्हणजेच अदानींना ओळखायचं बाकी आहे.” म्हणजे मस्कच्या एका ट्विटमुळे भारताच्या राजकारणातही चांगलीच फोडणी बसली.
पण आता मूळ मुद्द्यावर येऊया. मस्कने अंबानींवरच निशाणा का साधला? मस्कचा जिओशी काय संबंध? तर, याला कारणीभूत आहे स्पेक्ट्रम. आता स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर ज्या लहरींच्या माध्यमातून इंटरनेटचा डेटा हवेतून प्रवास करतो. मोबाईल चालवण्यासाठी जसं स्पेक्ट्रम लागतं, तसंच सॅटेलाईट इंटरनेटसाठीही स्पेक्ट्रम लागतं. या स्पेक्ट्रमच्या वाटपावरून मस्क आणि अंबानी यांच्यात प्रचंड मोठं वैचारिक युद्ध सुरू होतं.
मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओचं म्हणणं होतं की, भारतामध्ये जर कुणालाही इंटरनेट सेवा द्यायची असेल, मग ती परदेशी कंपनी असो की भारतीय, तर सरकारने त्या स्पेक्ट्रमचा लिलाव केला पाहिजे. लिलाव म्हणजे काय, तर जी कंपनी सगळ्यात जास्त बोली लावेल, सगळ्यात जास्त पैसे मोजेल, त्याला ते स्पेक्ट्रम मिळायला हवं. अंबानींचा युक्तिवाद असा होता की, आम्ही भारतामध्ये हजारो कोटी रुपये खर्च करून जमिनीखाली फायबर केबल टाकल्यात, गल्लीबोळात मोबाईलचे टॉवर उभे केलेत, 2G,3G,4G आणि आता 5G आणण्यासाठी अफाट पैसा लावलाय. जर परदेशी कंपन्यांना सरकारने बसल्या जागी स्पेक्ट्रम दिलं, तर ती आमच्यासारख्या भारतीय कंपन्यांवर मोठी नाकेबंदी ठरेल, म्हणून लिलावच झाला पाहिजे.
सॅटेलाइट इंटरनेटच्या स्पेक्ट्रमचं वाटप कसं होतं? ( Elon Musk Starlink India )
दुसऱ्या बाजूला इलॉन मस्कचं म्हणणं याच्या अगदी उलट होतं. मस्क म्हणत होता की, बाबांनो, सॅटेलाईट इंटरनेटचं स्पेक्ट्रम हे मोबाईलच्या स्पेक्ट्रमसारखं नसतं. अंतराळातल्या लहरी या सामायिक असतात. त्यावर कोण्या एकाचा मालकी हक्क नसतो. जगभरात कुठेही सॅटेलाईट स्पेक्ट्रमचा लिलाव होत नाही, तर तिथे अॅडमिनिस्ट्रेटिव्ह अलोकेशन म्हणजेच सरकारी वाटप केलं जातं. जर भारताने याचा लिलाव केला, तर स्पेक्ट्रम खूप महाग होईल. स्पेक्ट्रम महाग झालं की इंटरनेटचे प्लॅन्स महाग होतील आणि त्याचा फटका गरिबांना बसेल. मस्कच्या या भूमिकेला एअरटेलच्या सुनील मित्तल यांनी आधी विरोध केला होता, पण नंतर मस्कच्या बाजूने अनेक जागतिक तज्ज्ञांनी कौल दिला. या लढाईत पहिला विजय मस्कला मिळाला. भारताच्या दूरसंचार मंत्रालयाने आणि ट्रायने मोठा निर्णय घेताना अंबानींची मागणी फेटाळून लावली. सरकारने सांगितलं की, जागतिक नियमांनुसार सॅटेलाईट स्पेक्ट्रमचा लिलाव होणार नाही, तर ते वाटप पद्धतीनेच दिलं जाईल. मस्क खूश झाला, त्याला वाटलं आता पुढच्या दोन दिवसांत भारतात स्टारलिंकचे बॉक्स विकायला आपण मोकळे झालो. पण खरी गोची इथेच झाली.
स्पेक्ट्रम वाटपाचा नियम मस्कच्या बाजूने लागला तरी स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यासाठी कमर्शियल लायसन्स मिळालेलं नाही. हे लायसन्स अडकलंय भारताच्या गृह मंत्रालयाच्या सुरक्षा तपासणीमध्ये. भारताचे नियम अत्यंत कडक आहेत. सॅटेलाईट इंटरनेटच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेला काही धोका निर्माण होऊ नये, भारतातल्या नागरिकांचा डेटा देशाबाहेर जाऊ नये, यासाठी गृह मंत्रालय अतिशय काटेकोरपणे तपासणी करतं. स्टारलिंकने भारताला सुरक्षेची सर्व हमी दिली आहे की नाही, त्यांचे सर्व्हर भारतात असणार की नाही, यावर अजूनही कागदोपत्री खल सुरू आहे. मस्कला वाटतंय की ही सुरक्षा तपासणी म्हणजे केवळ एक बहाणा आहे आणि पडद्यामागून मुकेश अंबानी हे सरकारवर दबाव आणून आपली फाईल पुढे सरकू देत नाहीत. याच वैतागातून मस्कने ते डियर पंतप्रधान वाला ट्विट केलं.
हेही वाचा : भारतात AI Jobsचा बूम! 1.23 लाख Tech Openings; कोणत्या Skillsना सर्वाधिक मागणी?
या स्पर्धेचा भारतीय ग्राहकांना काय फायदा होऊ शकतो? ( Jio vs Starlink )
रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांना जेव्हा या वादाबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी अतिशय शांतपणे उत्तर दिलं. ते म्हणाले की, आम्हाला कोणाच्या ट्विटवर किंवा आरोपांवर उत्तर देण्यात रस नाही. आमचं पूर्ण लक्ष भारतीय ग्राहकांना सर्वोत्तम आणि परवडणाऱ्या दरात इंटरनेट सेवा देण्यावर आहे. स्पर्धा हवीच, पण ती नियमांच्या चौकटीत झाली पाहिजे.
एकीकडे जगातलं सगळ्यात मोठं सॅटेलाईट नेटवर्क उभा करणारा मस्क आहे, तर दुसरीकडे भारतातल्या घराघरात ५जी इंटरनेट पोहोचवणारे अंबानी आहेत. मस्कला भारतातल्या अथांग बाजारपेठेवर ताबा मिळवायचाय, तर अंबानींना आपला बालेकिल्ला शाबूत ठेवायचाय. आता मस्कच्या या आक्रमक ट्विटनंतर भारत सरकार स्टारलिंकला लवकर मंजुरी देणार की सुरक्षेच्या कारणास्तव मस्कला अजून वाट पाहावी लागणार, हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की, या दोन दिग्गजांच्या भांडणामध्ये फायदा मात्र शेवटी ग्राहकांचाच होणार आहे, कारण स्पर्धा जेवढी मोठी, तेवढं इंटरनेट स्वस्त आणि चांगलं मिळण्याची शक्यता जास्त….









