Major action by Dhule LCB : धुळे जिल्ह्यातून गुजरात राज्याकडे अवैध रित्या नेला जाणारा विदेशी मद्याचा मोठा साठा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 40 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणून पुढे गुजरातकडे विदेशी दारूची तस्करी होत असल्याची खात्रीशीर माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे 31 जानेवारी 2026 रोजी पहाटे, धुळे शहरातील नवीन सिव्हिल हॉस्पिटल समोर, धुळे-जळगाव बायपास हायवेवर पोलिसांनी सापळा रचला आणि मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
हेही वाचा – पोलीस आयुक्त कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसात तडीपार गुंडावर गुन्हा दाखल
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयास्पद टाटा कंपनीचा कंटेनर (क्रमांक RJ-52-GA-3630) घटनास्थळी आला असता पोलिसांनी तो अडवला. कंटेनर चालक अजय राजाराम वानखेडे (वय 52, रा. इंदोर, मध्य प्रदेश) याच्याकडे चौकशी केली असता त्याने कंटेनरमध्ये ‘स्पेअर पार्ट्स’ असल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांचा संशय बळावल्याने पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये किंगफिशर एक्स्ट्रा स्ट्रॉन्ग प्रीमियम बिअरचे तब्बल 400 बॉक्स आढळून आले. ही दारू केवळ मध्य प्रदेश राज्यात विक्रीसाठी असताना ती बेकायदेशीररित्या गुजरातकडे नेली जात होती.
या कारवाईत पोलिसांनी 15 लाख 36 हजार रुपये किमतीचा मद्यसाठा, 25 लाख रुपये किमतीचा कंटेनर आणि 3 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 40 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनजय देवर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मुंडे, तसेच संजय पाटील, पवन गवळी, संदीप पाटील, देवेंद्र ठाकूर आणि
मयूर पाटील यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून या मद्यतस्करीमागील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












