• Home
  • क्रीडा
  • रायझिंग स्टार्स आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव; वैभव सूर्यवंशीची शानदार खेळी व्यर्थ
क्रीडा

रायझिंग स्टार्स आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव; वैभव सूर्यवंशीची शानदार खेळी व्यर्थ

website 16 1

India vs Pakistan Rising Stars Asia Cup : भारतीय अ क्रिकेट संघाला आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेत पहिला पराभव पत्करावा लागला. पाकिस्ताननं भारताचा 8 विकेट्सनं पराभव केला. जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना 19 षटकांत 136 धावा केल्या. पाकिस्तानसाठी माझ सदाकतच्या अर्धशतकामुळं त्यांच्या संघाला विजय मिळाला. या स्पर्धेत भारताचा दोन सामन्यांतील हा पहिला पराभव आहे. वैभव सूर्यवंशीची शानदार खेळी निष्फळ ठरली. भारतानं त्यांच्या पहिल्या सामन्यात यूएईचा 148 धावांनी पराभव केला होता. आता भारतीय संघ 18 नोव्हेंबर रोजी त्यांच्या तिसऱ्या सामन्यात ओमानशी सामना करेल. पाकिस्ताननं सलग दोन विजयांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

भारताची फलंदाजी सपशेल अपयशी :

या विजयासह, पाकिस्तानचे दोन सामन्यांतून 4 गुण झाले आहेत आणि ते त्यांच्या गटात अव्वल स्थानावर आहे. दोन गुणांसह भारत पॉइंट टेबलमध्ये पाकिस्ताननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वैभव सूर्यवंशीच्या 45 आणि नमन धीरच्या 35 धावांच्या जोरावर 19 षटकांत 136 धावा केल्या. वैभवनं 28 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकार मारले. नमननं 20 चेंडूंत सहा चौकार आणि एक षटकारही मारला. हर्ष दुबे 19 धावांवर बाद झाला, तर कर्णधार जितेश शर्मानं फक्त पाच धावा केल्या.

सदाकतच्या खेळीमुळं पाकिस्तान विजयी :

पाकिस्तान अ संघानं सलामीवीर माज सदाकतच्या नाबाद 79 धावांच्या जोरावर दोन विकेट्स गमावून लक्ष्य गाठलं. सामनावीर सदाकतनं 47 चेंडूंत नाबाद 79 धावा केल्या, त्यात सात चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता आणि तीन षटकांत 12 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद फैकनं नाबाद 16 धावांचं योगदान दिलं. सलामीवीर मोहम्मद नईम 14 धावांवर बाद झाला, तर यासिर खाननं 11 धावांचं योगदान दिलं. भारताकडून यश ठाकूर आणि सुयश शर्मानं प्रत्येकी एक विकेट घेतली. पाकिस्ताननं ओमानला हरवले आणि त्यानंतर सलग दोन विजयांसह उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केलं आहे.

 

भारतीय खेळाडूंनी केलं नाही हस्तांदोलन : (India vs Pakistan Rising Stars Asia Cup)

भारतीय क्रिकेटपटूंची पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याची नीती आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतही कायम राहिली. भारत अ आणि पाकिस्तान अ संघाच्या खेळाडूंनी सामना सुरु होण्यापूर्वी हस्तांदोलन केलं नाही. सप्टेंबरमध्ये आशिया कप दरम्यान वरिष्ठ संघानं सुरु केलेला हा ट्रेंड कायम राहिला. राष्ट्रगीतानंतर, दोन्ही संघ आपापल्या मार्गानं गेले. पाकिस्तान अ संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सामना संपल्यानंतरही, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts