Spain vs Argentina Finalissima Cancelled: इराण-इस्राईलमध्ये सुरु असलेलया युद्धाचा परिणाम फुटबॉल खेळावरही झालाय. त्यामुळे स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील फायनालिसिमा सामना रद्द करण्याची आफत आयोजकांवर ओढवलीय. त्यामुळे बेबी मेसी आणि ग्रेट मेसी हे आता आमने-सामने येणार नाहीत. परिणामी फुटबॉल प्रेमींची निराशा झालीय.
स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील फायनालिसिमा सामना २७ मार्चमध्ये कतारमध्ये होणार होता. मात्र अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे हा सामना रद्द करण्याची आफत आयोजकांवर ओढवलीय. युद्धजन्य परिस्थितीमुळॆ सामना आयोजित करणे सुरक्षित नसल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आलाय.
हेही वाचा: Hospital Fire: कटक एससीबी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग; १० रुग्णांचा मृत्यू
२०२४ मध्ये युरो कपवर स्पेनचे वर्चस्व
दरम्यान २०२४ मध्ये युरो कपवर स्पेनने वर्चस्व मिळवले होते.तर कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाने वर्चस्व कायम राखले होते. या दोन्ही संघामध्ये दोहा येथे या महिन्याच्या शेवटी सामना रंगणार होता. फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू असलेले लिओनेल मेसी आणि उदयोन्मुख तारा लामिन यमाल पहिल्यांदाच आमनेसामने येणार होते. त्यामुळे फुटबॉल प्रेमींमध्ये उत्सुकता ताणली गेली होती. मात्र युद्धामुळे हा सामना होणार नसल्याने फुटबॉल प्रेमी नाराज झालेत.
पर्यायी तारखांवरही सहमती नाही
दरम्यान स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना रद्द झालयाने यूईएफए, कॉनमेबोल आणि स्थानिक आयोजन समितीने सामना घेण्यासाठी पर्यायी तारखांचा आणि ठिकाणांचा विचार केला होता. माद्रिद आणि ब्यूनस आयर्स येथेही सामना आयोजित करण्याची चर्चा झाली होती. मात्र शेवटी कोणत्याही पर्यायावर सहमती झाली नाही आणि हा मोठा सामना रद्द करावा लागला.
यूईएफएचे निवेदन जारी
स्पेन-अर्जेंटिना सामना रद्द झाल्यामुळे यूईएफएने अधिकृत निवेदन जारी केले. या निवेदनांत सामन्यासाठी पर्यायी तारखांवर विचार करण्यात आला होता. मात्र करण्यात आलेल्या चर्चेनंतर, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. २७ मार्चला माद्रिदमधील सॅंटियागो बर्नाब्यू स्टेडियममध्ये सामना घेण्याचा प्रस्ताव होता, पण अर्जेंटिनाने नकार दिला. त्यानंतर सामना माद्रिद आणि ब्यूनस आयर्स येथे दोन लेगमध्ये खेळवण्याच्या पर्यायावर विचार करण्यात आला.
मात्र त्यावरही सहमती झाली नाही. तर युरोपमधील कोणत्याही तटस्थ मैदानावर २७ किंवा ३० मार्चला खेळण्यास तयार होते, परंतु तो प्रस्तावही धुडकावण्यात आला. त्यानंतर अर्जेंटिनाने वर्ल्ड कपनंतर सामना घेण्याचा प्रस्ताव दिला, पण त्या वेळी स्पेनकडे उपलब्ध नव्हत्या.३१ मार्चची तारीखही सूचवण्यात आली, मात्र त्यावरही एकमत न झाल्याने हा सामना रद्द करण्याची वेळ आली.












