Jaipur Abhijit Dipke Attack: राजस्थानची राजधानी जयपूर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर अली आहे. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सुप्रीम कोर्टातील एका न्यायमूर्तींनी तरुणांचा उल्लेख “कॉक्रोच” असा केल्यानंतर अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर “कॉक्रोच जनता पार्टी”ची स्थापना केली होती. अल्पावधीतच या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि लाखो तरुण या मोहिमेशी जोडले गेले. अभिजित दीपके हे अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असताना त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती.
नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 6 जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर 12 जून रोजी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातही आंदोलन पार पडले.
जयपूर येथे आंदोलन
यानंतर सोमवार १५ जून रोजी जयपूर येथे पुन्हा एकदा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. अभिजित दीपके यांना समर्थकांनी खांद्यावर उचलून घोषणाबाजी सुरू असताना अचानक गर्दीतून एका व्यक्तीने त्यांच्या कानशिलात मारल्याचे सांगितले जात आहे.
कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त
या घटनेनंतर आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी केली. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
या प्रकरणी अधिकृत माहिती आणि पुढील कारवाईबाबत संबंधित प्रशासनाकडून अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.











