Cockroach Janata Party Protest: नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या वतीने दिल्लीतील जंतर- मंतर येथे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक तसेच पालक सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके (Abhijit Deepke) यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण व्यवस्थेवर टीका करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Education Minister Dharmendra Pradhan) यांनी काही दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशाराही दिला. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि स्पर्धा परीक्षांबाबत अविश्वास दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा: दिल्लीत अभिजीत दीपके यांची दमदार एंट्री; जंतर-मंतर आंदोलनाकडे देशाचे लक्ष
अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर दीपके थेट आंदोलनस्थळी पोहोचले. सकाळपासूनच जंतर- मंतर परिसरात आंदोलनकर्त्यांची गर्दी वाढू लागली होती. विविध राज्यांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली.
दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दिल्ली पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनादरम्यान काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य तणाव लक्षात घेऊन अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
याचवेळी पुण्यातील दीपके यांच्या निवासस्थानाबाहेरही पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे. परिसरात सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असून परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर देशव्यापी चर्चा व्हावी आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी आगामी काळात आणखी कार्यक्रम हाती घेण्याचे संकेत आंदोलन आयोजकांनी दिले आहेत.










