Latur | नीट पेपरफुटीमुळे (NEET Paper Leak Case) नीटची परीक्षा रद्द करण्यात आली असून आता ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये आता नीट परीक्षा रद्द झाल्याने लातूरमधील (Latur) एका विद्यार्थीनीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – सर्वसामान्यांचं टेन्शन वाढणार; सोने-चांदीचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या आजचे दर
लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या
लातूरमधील गोंदेगाव गावातीत मैथिली सोनावणे या विद्यार्थीनीनं आत्महत्या केली आहे. मैथिलीने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली याबाबत तिच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, त्यांना कोणावरही संशय नाही किंवा आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत कोणतीही तक्रार नाही.
मैथिली सोनावणेचे वडील अशोक विठ्ठल सोनावणे यांनी गटेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार, त्यांची मुलगी मैथिली यावर्षी बारावीच्या परीक्षेत 51.50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते त्यामुळे ती नीट (NEET) परीक्षेची तयारी करत होती. तिने सीईटी (CET) परीक्षाही दिली होती.
पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतर नीट परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे मैथिली तीव्र मानसिक तणावाखाली गेली होती. “मी चांगला अभ्यास केला आणि परीक्षेत चांगले गुण मिळवले, पण आता काय होईल?” असं म्हणत ती सतत आपली चिंता व्यक्त करत होती. तर 16 मे रोजी सकाळी सुमारे साडेआठ वाजता, मैथिली घरात न सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. नंतर ती त्यांच्या शेतातील एका कडुलिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळली, अशी माहिती मैथिलीच्या वडिलांनी पोलिसांनी दिली आहे. मैथिलीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे.
मैथिलीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला तात्काळ खाली उतरवून मुरुड येथील सरकारी उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर गोंदेगाव गावात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मैथिलीच्या आत्महत्येनं गोंदेगावात एकच खळबळ उडाली आहे.












