Cyber Fraud | अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे (War) अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. मध्य पूर्वेतील या युद्धामुळे भारताचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात गॅस तुटवडा (Gas Shortage) निर्माण झाला असून मोठे संकट निर्माण झाले आहे. एकिकडे गॅस तुटवड्यामुळे नागरिक चिंतेत असताना आता सायबर भामट्यांनी (Cyber Crime) जनतेची लूट करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा – वयाच्या 66 व्या वर्षी नीना गुप्ता प्रेग्नंट? ‘बधाई हो…’ म्हणत अभिनेत्रीने स्वतःच केला मोठा खुलासा
मुंबईत 26 लाख 43 हजारांची लूट
मागील चार दिवसांपासून मुंबईत गॅस कनेक्शन कापले जाण्याची भीती दाखवत सायबर भामट्यांनी अनेक लोकांना 26 लाख 43 हजारांचा गंडा घातला आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये मागील चार दिवसांमध्ये लोकांचे 26 लाख 43 हजार रूपये लुटले गेले आहेत. तर या प्रकरणी वडाळा, विलेपार्ले आणि पार्क साईड पोलीस स्थानकांच्या हद्दीमध्ये अनेक सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सायबर भामट्यांचा शोध घेत आहेत.
यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना मोठे आवाहन केले आहे. मध्य पूर्वेतील युद्धाचा आणि गॅस तुटवड्याचा कोणताही संबंध तुमच्या वैयक्तिक गॅस कनेक्शनशी जोडून कोणी पैसे मागत असेल तर ते सायबर भामटे असू शकतात. त्यामुळे अशावेळी त्वरित 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सायबर भामटे कशी करतात लोकांची फसवणूक?
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सायबर फसवणुकीच्या मोठ्या घटना समोर आल्या आहेत. गॅसचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भितीचे वातावरण आहे. या गोष्टीचा फायदा घेत सायबर भामट्यांनी लोकांची फसवणूक करत त्यांना मोठ्या प्रमाणात लुटले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करत त्यांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे.
सायबर भामटे हे ‘महानगर गॅस लिमिटेड’चे अधिकारी असल्याचं सांगत लोकांना फोन करतात. त्यानंतर तुमचे गॅस बिल थकीत असून गॅसचा पुरवठा कमी असल्यामुळे तुमचे कनेक्शन कापले जाणार असल्याची भीती लोकांच्या मनात घालतात. तसेच जर तुमचे कनेक्शन सुरू ठेवायचे असेल तर 10 किंवा 20 रूपये भरायला सांगतात. नंतर ते ‘mahanagar apk’ नावाने एक फाईल पाठवतात. या फाईलची लिंक क्लिक करताच पीडित लोकांच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा सायबर भामट्यांकडे जातो आणि ते काही क्षणातच पीडित लोकांचे बँक खाते रिकामे करतात. अशाप्रकारे सायबर भामटे लोकांची फसवणूक करताना दिसत आहेत.












