US-Iran War | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला (Iran) 48 तासांच्या आत करार करण्याची धमकी दिली आहे. जर इराणने 48 तासांच्या आत शांतता करार स्वीकारला नाही, तर आम्ही इराणची महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा नष्ट करू, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तर इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीला फेटाळून लावले आहे. तसेच इराणच्या केंद्रीय लष्करी कमांडने अमेरिकेला गंभीर इशारा देखील आहे.
हेही वाचा – मध्य प्रदेशमध्ये मोठा अपघात; तीन मजली इमारत कोसळली, एकाचा दुर्दैवी मृत्यू
अमेरिकेने दिलेल्या धमकीवर इराणने काय दिले प्रत्युत्तर?
इराणने अमेरिकेने दिलेल्या धमकीला एक मूर्खपणाचे पाऊल म्हटले असून, यामुळे तुमच्यासाठी (अमेरिकेसाठी) नरकाचे दरवाजे उघडले जातील, असेही म्हटले आहे. खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयातून जारी केलेल्या निवेदनात इराणी लष्करी जनरल अली अब्दुल्लाही अलीआबादी म्हणाले की, ट्रम्प यांची धमकी एक असहाय्य, घाबरलेले, असंतुलित आणि मूर्खपणाचे कृत्य आहे. तसेच लवकरच तुमच्यासाठी नरकाचे दरवाजे उघडले जातील, असा गंभीर इशारा जनरल अली अब्दुल्लाही अलीआबादी यांनी दिला.
इराणने अमेरिकेला दिला गंभीर इशारा
इराणने अमेरिकेला पहिल्यांदाच अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. अमेरिका आणि इस्रायल आत्ता जे करत आहेत त्यामुळे तेहरानला काहीही इजा होणार नाही. मात्र कतार, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, आणि ओमानसारख्या देशांमधील जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. तसेच अमेरिका आणि इस्रायलने आतापर्यंत आमच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर चार वेळा बॉम्बहल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे जर किरणोत्सर्गी परिणाम झाला तर त्यामुळे फक्त तेहरानमध्येच नव्हे तर सौदी अरेबिया, यूएई, कुवेत, बहरीन, कतार आणि ओमान राजधान्यांमध्येही जीवन उद्ध्वस्त होईल, असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत इराणला धमकीवजा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी इराणला 48 तासांची मुदत दिली आहे. आठवतंय का, जेव्हा मी इराणला करार करण्यासाठी किंवा होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली होती? आता वेळ निघून जात आहे. फक्त 48 तास शिल्लक आहेत. त्यामुळे इराणवर प्रलय कोसळण्यापूर्वी, देव त्यांचे भले करो”, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.












