Donald Trump | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. दररोजच्या वाढत्या संघर्षामुळे तिन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. एकिकडे अमेरिका आणि इस्त्रायल इराणवर जोरदार हल्ले करत आहे. तर दुसरीकडे इराणने देखील प्रत्युत्तर म्हणून ड्रोन, मिसाईल डागलत हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. तर या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद केला आहे. हा मार्ग बंद केल्यामुळे अनेक देशांचे तेलाचे, गॅसचे टँकर असलेले जहाज अडकून पडले आहेत. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला थेट धमकी दिली आहे.
हेही वाचा – खरातच्या फोनमधून मोठा खुलासा; महिलांसाठी खास नंबर तर नेत्यांसाठी…, खळबळजनक माहिती समोर
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला काय दिली धमकी?
डोनाल्ड ट्रम्प यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी युद्धाबाबतची माहिती देत थेट इराणला मोठा इशारा दिला. जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर त्यांच्या अणुकेंद्रांवर थेट हल्ले चढवले जातील, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली आहे.
देशाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, होर्मुझ सामुद्रधुनीची आम्हाला काहीही गरज नाही. ज्या देशांना या मार्गाची गरज आहे त्यांनी याचे संरक्षण करायला हवे. तसेच व्हेनेझुएलातील तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांच्या विकासाबाबात आणि ते विकण्याबाबत काम केले जात आहे. त्यामुळे अमेरिका आता मध्य-पूर्वेतील ऊर्जेवर अवलंबून नाहीये. पण जरी असं असलं तरी मित्रराष्ट्रांच्या मदतीसाठी अमेरिका नेहमीच उपस्थित राहील, असं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं.
जरी पडद्याआड कुटनितीची चर्चा सुरू असली तरी येत्या दोन-तीन आठवड्यांमध्ये आम्ही इराणवर मोठे हल्ले करणार आहोत. यावेळी इराणच्या पायाभूत सुविधांना देखील लक्ष्य केले जाईल. तसेच जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली केली नाही तर त्यांच्या अणुकेंद्रांवरही थेट हल्ले चढवले जातील, असा गंभीर इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर हे युद्ध चांगलंच पेटणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. हे युद्ध सुरू होऊन एक महिना उलटून गेला आहे तरीही हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. एकिकडे अमेरिका इराणवर हल्ला करत आहे. तर दुसरीकडे इराणही अमेरिकेला चोख उत्तर देताना दिसत आहे. त्यामुळे सध्या अमेरिका आणि इराणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.












