India Iran friendship : मध्य पूर्वेतील युद्धामुळं एकीकडं कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 200 डॉलरवर जाण्याचा जागतिक इशारा देणाऱ्या इराणनं दुसरीकडं मात्र भारत आमचा मित्र देश असल्याचं सांगत भारतीय ध्वज असलेल्या तेलाच्या दोन टँकरना हार्मुझ सामुद्रधुनीमधून सेफ पॅसेज दिलाय. त्यामुळं सुमारे 40 लाख लिटर बॅरल तेल भारतीय बंदरांमध्ये सुरक्षितरित्या दाखल होणार आहे. भारताच्या राजनैतिक धोरणाचं हे यश असल्याचं आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात बोललं जातंय.
होर्मुझ सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती
इराणसोबत इस्रायल-अमेरिकेचं युद्ध सुरू असल्यानं होर्मुझ सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळं कच्च्या तेलाची वाहतूक थांबलीय. त्यातच आता इराणनं कच्च्या तेलाच्या किमती 200 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढू शकतात, असा इशारा दिल्यानंतर जगात एकच खळबळ उडालीय. या युद्धामुळं आधीच जगाला होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झालाय. भारतात तर एलपीजीचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला असून दोन दिवसांपासून देशातल्या विविध प्रमुख शहरांतील हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
तेलवाहू जहाज जाऊ देणार नाही; इराणकडून इशारा
जगभरात सुरू असलेल्या उर्जा संकट काळात भारताच्या दृष्टीनं मात्र दिलासादायक बातमी समोर आलीये. इराणकडून हार्मुझ सामुद्रधुनीमधून कोणतंही तेलवाहू जहाज जाऊ देणार नाही, असा इशारा दिला असतानाच या मार्गातून भारतीय ध्वज असलेले तेलाचे टँकर सोडण्याचा निर्णय घेतलाय. भारताचे पराराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरगची यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय झाल्याचं सांगितलं जातंय. या सामुद्रधुनीतून अमेरिका, युरोप आणि इस्त्रायल यांचे तेलवाहू टँकर्स अजिबात जाऊ दिले जात नसताना भारताचे तेलवाहू टँकर जाऊ देण्यास परवानगी देऊन इराणनं आपली भारताशी असलेली मैत्री मात्र जपलीये.
दररोज सुमारे 20 मिलियन बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक
भारतीय ध्वज असलेले पुष्पक आणि परिमल हे दोन तेलवाहू टँकर हार्मुझ सामुद्रधुनी ओलांडून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गुजरातच्या जामनगर आणि कर्नाटकातील मंगळुरू बंदराकडं सुरक्षितरित्या येऊ लागली आहेत. इराणच्या समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या हार्मुझ सामुद्रधुनीमधून दररोज सुमारे 20 मिलियन बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते. समुद्रामार्गे होणाऱ्या तेलवाहतुकीच्या एक तृतीयांश वाहतूक ही याच मार्गे होते. त्यामुळं जगाच्या दृष्टीकोनातून हार्मुझ सामुद्रधुनी ही अत्यंत महत्वाची आहे. जगातील मोठ्या प्रमाणावर लिक्विफाईड नैसर्गिक गॅसची वाहतूक देखील याच सामुद्रधुनीतून होते. इथं काही गडबड झाली तर जागतिक अर्थव्यवस्था, सप्लाय चेन शिवाय प्रत्येक घराचं बजेट कोलमडलंच म्हणून समजा!
रशियाकडून 3 कोटी लिटर बॅरल तेल भारतात दाखल होणार
या टँकरमधून भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा वापर पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधन बनवण्यासाठी होतो. इतकंच नव्हे, तर येत्या काळात रशियाकडून 3 कोटी लिटर बॅरल तेल भारतात दाखल होणार आहे.भारतानं रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत आणि प्रादेशिक शांततेबाबत घेतलेल्या संतुलित भूमिकेमुळं इराणनं भारताला ही विशेष सवलत दिल्याची चर्चा आतांबआंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ लागलीये.
भारताची जागतिक पातळीवरील राजकीय मुत्सद्देगिरी याठिकाणी कामी
मध्य पूर्वेतील युद्धामुळं संपूर्ण जग ऊर्जा संकटातून जात असताना भारताची जागतिक पातळीवरील राजकीय मुत्सद्देगिरी याठिकाणी कामी आली हे इथं मान्यच करावं लागेल परंतु, या कृतीतून इराणनं अमेरिका आमचा शत्रू, तर भारत आमचा मित्र हे साऱ्या जगाला दाखवून दिलंय हे नक्की!












