गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पावसाने हाहाकार माजवल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे बरीच गावे, शेती पाण्याखाली गेले असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहे. आज पहाटे पासूनच पावसाने हजेरी लावली असून सर्वत्र आज अलर्ट देण्यात आला आहे.
आज भारतीय हवामान खात्याने उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट तर मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, पुणे या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून धुळे, आहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबारमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. यासह कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सर्वत्र जोरदार पाऊस असल्याने सर्व पिके वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. महाराष्ट्रातील ज्या भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालीय त्या भागात शोधमोहीम आणि बचावकार्य सुरु असून अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पंचनामे करण्यात येत आहे.
या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
सतत सुरु असलेल्या पावसामुळे सोलापूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि छ. संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसामुळे खाजगी शासकीय सर्वच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.तसेच प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.