राज्य सरकारने महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून या निर्णयामुळे तुम्ही रात्री प्रवास करणार असाल तर जेवणाची चिंताच विसरून जाल. आणि तुम्ही रात्री 12 च्या नंतर देखील फिरायला जाऊ शकाल. याला कारण आहे, महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय. कारण आता हॉटेल, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, दुकाने यासारखी ठिकाणे 24 तास खुली राहणार आहेत.
जर तुम्ही प्रवासात असाल, आणि रात्री अचानक भूक लागली तर जेवणार कुठे हा प्रश्न पडतो. परंतु आता तुम्हाला रात्री 12 वाजता भूक मारून झोपावे नाही लागणार. चित्रपट बघायचा असेल तर सकाळची वाट न बघता तुम्ही रात्री देखील चित्रपट एन्जॉय करू शकतात. तसेच ऑफिसमध्ये उशिरा पर्यंत काम करणाऱ्या लोकांना देखील या निर्णयाचा फायदा होणार आहे.
राज्य सरकारने आस्थापनांना २४ तास सुरु ठेवण्याची परवानगी दिली असून कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबाबतही विशेष निर्णय घेतला आहे. यासह आस्थापनांना आठवड्यातून एक दिवस सलग २४ तासांची आठवड्याची सुट्टी बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे कोणत्याही वेळेला अन्न, पाणी, किराणा किंवा औषधं सहजरीत्या उपलब्ध होणार आहेत. यामुळे दैनंदिन आयुष्य सोप्प होण्यास फायदा होणार आहे.
महाविकास आघाडीच्या काळात आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफची संकल्पना मंडळी होती. आता या संकल्पनेवर भर देण्यात आल्याचे दिसत आहे. या संकल्पनेवर भाजप ने टीका केली होती परंतु आता याच संकल्पनेवर भाजपने निर्णय घेतला आहे. याबाबत उद्योग विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यानुसार, आठवड्यातील सर्व दिवस आस्थापनं सुरू ठेवता येतील.
ग्राहकांसह व्यापारी वर्गाला देखील होणार फायदा
राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय फक्त ग्राहकांसाठीच फायदेशीर नसून व्यापाऱ्यांसाठीही फायद्याचा आहे. व्यापारी वर्गाकडे आता त्यांची दुकाने २४ तास खुले ठेवण्याचा पर्याय असेल. जे व्यापारी अतिरिक्त मेहनत घेऊन रात्रीचीही ग्राहक सेवा करतील, त्यांना जास्त उत्पन्न मिळू शकेल. खासकरून मोठ्या शहरांमध्ये, जिथे रात्रभर कामं चालतात, तिथे याचा मोठा फायदा होईल.
मनोरंजनप्रेमी लोकांना होणार फायदा
सिनेमागृह नाट्यगृह किंवा मॉल ठराविक वेळेपर्यंत चालू असतात. परंतु आता मनोरंजन देखील आपल्याला २४/७ मिळणार आहे. म्हणजेच आता आपल्याला आपल्या सोयीनुसार चित्रपट पाहता येणार आहे.
या गोष्टी राहणार बंद
राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय घेत असताना त्यांनी एक विशेष बाबीकडे लक्ष दिले आहे. ते म्हणजे दारूची दुकानं, परमिट रूम्स, हुक्का पार्लर आणि देशी बार. या सर्व बाबींना या नियमातून वगळण्यात आले आहे. ही ठिकाणे देखील २४ तास सुरु राहिली तर रात्री गोंधळ, भांडण आणि खास करून गुन्हेगारी देखील वाढण्याची भीती राहील. त्यामुळे त्यांनी या काही बाबी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय कष्टकरी लोकांसाठी दिलासा असेल. कारण त्यांना आता कष्ट करण्यासाठी वेळेचे बंधन नसेल. तोच निर्णय व्यापाऱ्यांसाठी नवी संधी मिळवून देऊ शकतो. कारण त्यांना जास्त ग्राहक मिळवता येतील. आणि राज्याच्या प्रगतीचा टप्पा ठरेल.