Rapido Driver Controversy : तंत्रज्ञानाने माणसाचं आयुष्य जितकं सोपं केलं आहे, तितक्याच काही धक्कादायक घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. Rapido सारख्या राइड सेवा वापरणं आज खूप सोपं झालं असलं, तरी काही ड्रायव्हर्सच्या वर्तनामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रेटर नोएडामधील एका तरुणीसोबत घडलेला प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. शैव्या वशिष्ठ नावाच्या तरुणीने स्वतःचा हा भयानक अनुभव व्हिडीओद्वारे शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दिल्लीहून ग्रेटर नोएडाला जाण्यासाठी Rapido राइड बुक केली होती. मात्र, ही राइड तिच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा त्रासदायक अनुभव ठरेल, याची तिला कल्पनाही नव्हती.
राइडदरम्यानच ड्रायव्हर विचित्र वागत असल्याचं तिला जाणवत होतं. उशिराच्या प्रवासात त्याने मोठ्या आवाजात इमरान हाश्मीची गाणी लावली होती, ज्यामुळे शैव्या अस्वस्थ झाली होती. रात्री १२ वाजता राइड संपल्यानंतरही ड्रायव्हरचे सतत फोन येऊ लागले. त्रास वाढू नये म्हणून तिने तो नंबर ब्लॉक केला. मात्र, खरी धक्कादायक घटना त्यानंतर घडली. शैव्या ऑफिसमध्ये असताना तिला एका अनोळखी नंबरवरून व्हिडीओ कॉल येऊ लागले. सुरुवातीला तिने कॉल दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला, पण चुकून एक कॉल उचलला आणि ती हादरून गेली.तो व्हिडीओ कॉल बाथरूममधून करण्यात आला होता आणि समोर तोच Rapido ड्रायव्हर होता. कॉलदरम्यान तो अत्यंत अश्लील आणि धक्कादायक कृत्य करत होता. या संपूर्ण घटनेमुळे आपण मानसिक धक्क्यात गेलो असल्याचं शैव्याने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर Rapido कंपनीने संबंधित ड्रायव्हरवर कारवाई करत त्याची आयडी सस्पेंड केल्याची माहिती दिली. मात्र, ही कारवाई कितपत प्रभावी आहे याबाबत शैव्याने शंका व्यक्त केली आहे. या घटनेमुळे सध्या माहीलांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.












