मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना उत्तर भारतीयांची मतं घेण्याच्या नादात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी खुद्द मायमराठीच्या मरणाची इच्छा व्यक्त केली. मराठी आई मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी जगली पाहिजे. कारण ती जास्त प्रेम करते, असे असंवेदनाहीन विधान प्रकाश सुर्वे यांनी केले आहे. विरोधी पक्षांनी प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली आहे. प्रकाश सुर्वे यांचे वक्तव्य हा प्रत्येक मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान असल्याचं विरोधकांनी म्हणालं आहे.
हे ही वाचा – राज्य आणि केंद्र सरकार ‘जेन झी’ पिढीच्या मुलांना का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील एका आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. “मराठी माझी आई आहे, आणि (उत्तर भारतीय) हिंदी माझी मावशी आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल, पण माझी मावशी जगली पाहिजे असं धक्कादायक विधान आमदार प्रकाश सुर्वे त्यांनी केलं आहे. एका सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं असून, यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तर भारतीय मतदारांना खूष करण्यासाठी किंवा त्यांची मतं आपल्या पारड्यात पाडण्यासाठी त्यांनी हे विधान केलं असलं तरी, त्यांच्या विधानामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.
प्रकाश सुर्वे काय म्हणाले..
“मराठी माझी मातृभूमी आणि आई आहे. आणि उत्तर भारत माझी मावशी आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी मरता कामा नये. कारण मावशी जास्त प्रेम करते. आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही मला दिलं आहे. हेच प्रेम माझ्या सहकाऱ्यांवरही कायम ठेवा”, असं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलं आहे.
अमराठी मतांवर सत्ताधारी पक्षांचा डोळा ?
मुंबई महापालिका निवडणुकीत अमराठी मते ही निर्णायक ठरू लागल्याने सत्ताधारी पक्षांचा डोळा हा त्याच मतांवर असतो. याच पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय समूहाच्या एका कार्यक्रमात बोलताना प्रकाश सुर्वे यांनी अमराठी लोकांचे गुणगाण गाताना चक्क मराठी मेली तरी चालेल, असे वक्तव्य केले. महापालिका निवडणुकीत अमराठी लोकांनी मतदान करावे या उद्देशाने त्यांनी चक्क आईच्या मरणाची इच्छा व्यक्त करून अमराठी मावशी जगावी, असा आशावाद व्यक्त केला.










