Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • राज्याच्या राजकारणातल्या ५ मोठ्या घडामोडी, वाचा सविस्तर सत्ताकारणाचा पट..
Top News

राज्याच्या राजकारणातल्या ५ मोठ्या घडामोडी, वाचा सविस्तर सत्ताकारणाचा पट..

5 major developments in state politics

5 major developments in state politics : हाताशी धरून २ डिसेंबरची निवडणूक रद्द केल्याचा आरोप शिंदे गटाने भाजपावर केला. दोन दिवसांत शिंदेंच्या सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने मातोश्रीवर पक्षप्रवेशाची लगबग दिसून आली. राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना राज ठाकरे हे अचानक दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावरून अंबादास दानवेंनी महायुती सरकारला चार महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. नगरपालिका निवडणुकांचा निकाल पुढे गेल्याने मतयंत्रांत घालमेल करण्याची संधी सरकारला मिळू शकते, अशी टीका काँग्रेसने केली. या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊ..

१. मित्रपक्ष शिंदे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

निवडणूक आयोगाने काही जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत पराभव लक्षात येताच निवडणूक आयोगाला हाताशी धरून २ डिसेंबर २०२५ रोजी होणारी निवडणूक रद्द करण्यात आली, असा आरोप शिंदेसेनेने भाजपावर केला आहे. निवडणूक पुढे ढकल्याने त्याचा मोठा त्रास हा उमेदवार व मतदार राजाला होणार आहे, त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध करत आहोत, अशी बॅनरबाजी शिंदे गटाने अंबरनाथमध्ये केली आहे. अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना रंगला आहे.

२. मातोश्रीवर ठाणे, मुंबईतील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश

शिंदे गटातील अनेक पदाधिकारी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करीत आहेत. गेल्या दोन दिवसांत शिंदेंच्या १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची कास धरली आहे. त्यामुळे मातोश्रीवर पक्षप्रवेशांची लगबग दिसून येत असून कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहे. एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर शिंदेंच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातील जवळपास १०० कार्यकर्ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत. त्याशिवाय शिंदे गटाचे नवी मुंबईतील सहसंपर्क प्रमुख शिरीष पाटील यांनीदेखील आपल्या शेकडो समर्थकांसह मशाल हाती घेतली आहे.

३. अंबादास दानवेंचे सरकारला चार महत्वाचे प्रश्न

पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावरून अंबादास दानवेंनी महायुती सरकारला काही महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला अखेर अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे, अशी पोस्ट दानवेंनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केली आहे. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही? पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ मुदतवाढ’ खेळणार आहात? अमेडिया कंपनीत केवळ १ टक्का भागधारक दिग्विजय हा ९९ टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का? मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार? ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर, अशी टीकाही दानवे यांनी पोस्टमधून केली आहे.

४. काँग्रेसची महायुती सरकारवर टीका..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील गोंधळ हा निवडणूक आयोगाच्या अक्षमतेचा जिवंत पुरावा आहे. आता निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन नगरपालिका निवडणुकांचा निकाल तीन तारखेऐवजी २१ तारखेला जाहीर होणार आहे. म्हणजेच १६-१७ दिवस मतयंत्रे शासकीय गोदामात पडून राहणार आहेत, असा संशय माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीने नागरिकांना वेळेवर निवडणूक होण्याचा घटनात्मक अधिकार दिला, पण तो अधिकार भाजपा सरकारने आपल्या राजकीय स्वार्थासाठी पायदळी तुडवल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

५. राज ठाकरे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण राजकीय नसून कौटुंबिक असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे. राज यांची सून मिताली ठाकरे यांचे बंधू डॉ. राहुल बोरुडे यांचा ५ डिसेंबर रोजी दिल्लीत विवाह पार पडणार आहे. या सोहळ्याला ठाकरे कुटुंबातील सर्वच नातेवाईक उपस्थित राहणार आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts