Union Budget 2026 : भारताचा 2026 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज, रविवार, 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. संपूर्ण देशाचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष आहे. शेतकरी, महिला, पगारदार वर्ग आणि सामान्य माणसापासून ते सर्वजण मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा बाळगून आहेत. करदाते आणि मध्यमवर्गीयांनाही या अर्थसंकल्पातून दिलासा मिळण्याची आशा आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे दुसरं अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांचा नववा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तुम्हाला माहिती आहे का कोणत्या भारतीय नेत्यानं सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम केला आहे, जे फक्त 800 शब्दांचं होतं? चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण :
माजी अर्थमंत्री हिरुभाई मुलजीभाई पटेल यांनी सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम केला आहे. 1977 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री हिरुभाई मुलजीभाई पटेल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, जो फक्त 800 शब्दांचा होता. दरम्यान, सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम निर्मला सीतारमण यांच्याकडे आहे. 1 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी दोन तास 40 मिनिटं भाषण दिलं.
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे नेते :
स्वतंत्र भारतात सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी 1959-1964 दरम्यान सहा आणि 1967-1969 दरम्यान चार वेळा अर्थसंकल्प सादर केले. तर पी. चिदंबरम यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि प्रणव मुखर्जी यांनी आठ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि 1 फेब्रुवारी रोजी त्या नवव्यांदा ते सादर करतील.
बजेट दिनाचं संपूर्ण वेळापत्रक :
लोकसभेत सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषण सुरु होईल. निर्मला सीतारमण सकाळी 8:30 वाजता अर्थ मंत्रालयात पोहोचणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्या. अर्थसंकल्पाला अंतिम स्पर्श दिल्यानंतर, अर्थमंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अर्थसंकल्पाची प्रत सुपूर्द केली. त्यानंतर निर्मला सीतारमण सकाळी 10:15 वाजता संसद भवनात पोहोचल्या, जिथं मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्प मंजूर केला जाईल. त्यानंतर, लोकसभेत कामकाज सुरु होताच लगेचच अर्थसंकल्पीय भाषण दिले जाईल. आजचं अर्थसंकल्पीय सादरीकरण एक विक्रम आहे. कारण रविवारी अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ असेल.











