• Home
  • देश
  • भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेसोबंत 10 वर्षांच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी
Top News

भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेसोबंत 10 वर्षांच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी

website 12 3

India US defense agreement : भारताच्या संरक्षण आणि धोरणात्मक क्षेत्रात एकाच वेळी दोन मोठे करार झाले आहेत. एक अमेरिकेसोबत संरक्षण भागीदारीचा आणि दुसरा रशियासोबत विमाननिर्मिती क्षेत्रातील सहकार्याचा. या दोन्ही घडामोडींमुळे भारताने जागतिक स्तरावर आपल्या संरक्षण क्षमतेचा आणि औद्योगिक सामर्थ्याचा मजबूत ठसा उमटवला आहे.

भारत-अमेरिका 10 वर्षांचा संरक्षण करार :

गेल्या काही महिन्यांत व्यापारी आणि धोरणात्मक मतभेदांमुळे भारत-अमेरिका संबंधांत तणाव वाढला होता. तरीदेखील दोन्ही देशांनी आपापल्या हितसंबंधांना प्राधान्य देत १० वर्षांच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी मलेशियामध्ये या करारावर सही केली. या कराराद्वारे दोन्ही देशांच्या संरक्षण भागीदारीत नवं पर्व सुरू होणार आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव हेगसेथ यांनी या कराराला “भागीदारी अधिक बळकट करण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल” असं संबोधलं आहे. त्यांनी म्हटलं की, भारत आणि अमेरिकेतील लष्करी संबंध यापूर्वी कधीही इतके सक्षम नव्हते.

 

नव्या दशकाची सुरुवात :

राजनाथ सिंह यांनी एक्सवर (Twitter) पोस्ट करत सांगितलं की, “या करारामुळं भारत-अमेरिका संरक्षण सहकार्याच्या सर्वच क्षेत्रांना नवीन दिशा मिळेल. हे भागीदारीच्या नव्या दशकाची सुरुवात ठरेल आणि द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ बनेल.” त्यांच्या म्हणण्यानुसार, या करारामुळं दोन्ही देशांमधील सामरिक समन्वय आणि तांत्रिक देवाणघेवाण अधिक मजबूत होणार आहे.

रशियासोबत विमाननिर्मिती करार (India US defense agreement)

संरक्षण क्षेत्रासोबतच विमान उद्योगातही भारताने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाची युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) यांनी ‘सुखोई सुपरजेट SJ-100’ नागरी विमान निर्मितीसाठी करार केला आहे. मॉस्कोमध्ये झालेल्या या समझौत्यामुळं भारत पहिल्यांदाच पूर्ण प्रवासी विमान निर्मितीच्या दिशेनं पुढं जात आहे. या प्रकल्पामुळं प्रादेशिक हवाई संपर्क वाढेल, ‘मेक इन इंडिया’ला चालना मिळेल आणि देशांतर्गत विमान उद्योगासाठी एक नवीन युग सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या दोन करारांमुळे भारतानं एका बाजूला अमेरिकेसोबत धोरणात्मक सुरक्षा भागीदारी मजबूत केली, तर दुसऱ्या बाजूला रशियासोबत औद्योगिक सहकार्यातून ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेनं निर्णायक पाऊल टाकलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts