Mini Assembly Session in State : मागील काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची रणधुमाळी अखेर आजपासून सुरु झाली आहे. राज्याच्या मिनी विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आजपासून सुरु होत आहे. राज्यातील राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. या निवडणुकांमध्ये प्रभाग रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरु होत असली तरी अद्यापही अनेक ठिकाणी युती-आघाडीबाबत संभ्रम असल्याचं चित्र आहे. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळासह नवी समीकरणंही दिसण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्व नगरपालिकांची मुदत 2022 पर्यंत संपुष्टात आली होती. पूर्वीच्या 236 नगरपालिकांसह नव्यानं स्थापन झालेल्या 10 नगरपालिकांचा समावेश या निवडणुकांत आहे. करोना महासाथ, आरक्षणाबाबतच्या याचिकांसह इतर विविध कारणांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 31 जानेवारी 2026 पर्यंत सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.
नवीन प्रभाग पद्धती :
नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू होणार आहे. मतदारांनी नगराध्यक्षासाठी एक आणि प्रभागातील सदस्यांसाठी दोन असे प्रत्येकी तीन मतांचा वापर करावा लागणार आहे. तर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष आणि सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मतं देण्याची प्रणाली राहणार आहे. पहिल्या टप्प्यात 242 नगरपालिका व 46 नगरपंचायतींच्या 6,859 जागांसाठी मतदान होणार आहे. 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीनं निवडणूक होईल.
युती-आघाडीचं भिजत घोंगडं :
महायुती आणि महाविकास आघाडीत नगरपालिका निवडणुकांसाठी अद्याप राज्यस्तरीय आघाडीबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. युती-आघाडीबाबत सर्व प्रमुख पक्षांनी स्थानिक पातळीवर अधिकार सोपवले आहेत. स्थानिक समीकरणं, नाराजी आणि अंतर्गत गटबाजी टाळण्यासाठी ही भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. स्थानिक नेतृत्वाला स्वातंत्र्य दिल्यानं काही ठिकाणी सोयीस्कर आघाडी तयार होण्याची शक्यता आहे. तर काही नगरपरिषदांमध्ये पक्षाचे अधिकृत चिन्ह न वापरता निवडणूक लढवण्याबाबतही चर्चा सुरु आहेत.
कुठं आणि किती जागांसाठी निवडणूक?
– नगरपालिका: 246
– नगरपंचायती: 42
– एकूण जागा: 6859
निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा :
– अर्ज दाखल प्रक्रिया: 10 ते 17 नोव्हेंबर
– अर्ज माघार 21 नोव्हेंबरपर्यंत
– मतदान: 2 डिसेंबर
– मतमोजणी: 3 डिसेंबर
विभागनिहाय नगरपालिका व नगरपंचायती (Mini Assembly Session in State)
कोकण: 27, नाशिक: 49, पुणे: 60, नागपूर: 55, छत्रपती संभाजीनगर: 52, अमरावती: 45












