• Home
  • राजकारण
  • भाजपचा ‘बिनविरोध’ पॅटर्न! शिवसेनेला धक्का देत, महाजनांच्या पत्नीचा विजय
Top News

भाजपचा ‘बिनविरोध’ पॅटर्न! शिवसेनेला धक्का देत, महाजनांच्या पत्नीचा विजय

Girish Mahajan wife victory

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने यंदा बिनविरोध पॅटर्न राबवल्याचं पाहायला मिळत आहे. ऑपरेशन लोटसमध्ये भाजपने निवडणुकांच्या अगोदरच अनेक माजी आमदार आणि जिल्ह्यातील बडे नेते गळाला लावले आहेत. त्यानंतर, आता नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न सुरू केल्याचं दिसून येत आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या मंत्री गिरीष महाजन यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला धक्का दिला आहे. जामनेर नगरपालिकेत पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जळगावत शिवसेना शिंदे आणि भाजपात नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – “चांगला शिक्षक मिळाला असता तर…”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात

जामनेर नगरपालिकेत साधना महाजन यांची बिनविरोध अध्यक्षपदी वर्णी

सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंयायत, त्यानंतर धुळे जिल्ह्यातील दोंडाई आणि आता जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेत अध्यक्षपदी भाजप नेत्यांची बिनविरोध वर्णी लागल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही महिला उमेदवार असून दोन विद्यमान भाजप मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्या आहेत. जामनेर नगरपालिका निवडणुकीत साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीच्या ज्योत्सना विसपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

नगरसेवक पदासाठी शिवसेनेला धक्का..

जामनेर नगरपालिका निवडणुकीत साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली असून दोन ठिकाणी नगरसेवक पदासाठी देखील शिवसेनेला धक्का देण्यात आला आहे. शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या दोन उमेदवारांनी अर्ज माघारी घेत भाजपमध्ये प्रवेश केला. जामनेरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेचे दोन उमेदवार आमने सामने उभे ठाकले होते.

 शिंदे गटाच्या मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणेंकडून अर्ज मागे

शिंदेंच्या शिवसेनेकडून वॉर्ड नंबर 1 मधून मयुरी चव्हाण आणि वॉर्ड नंबर 13 ब मधून रेशंता सोनवणे यांनी अर्ज दाखल केला होता. तर भाजपकडून वॉर्ड 1 नंबर सपना झाल्टे आणि वॉर्ड नंबर 13 मधून किलुबाई शेवाळे यांनी अर्ज केला होता. त्यामुळे, या ठिकाणी भाजप विरूद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लढत होणार होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणेंकडून अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts