Ram Temple Flag Hoisting : अयोध्येतील राम मंदिरावर ऐतिहासिक ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. सध्या राम मंदिरात ध्वजारोहण समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तसचं राम मंदिराच्या शिखरावर २२ फूट लांब व ११ फूट रुंद ध्वजारोहण करण्यात येईल. हा समारंभ भव्य प्राणप्रतिष्ठा समारंभासारखाच भव्य असेल आणि राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेचेही प्रतीक असेल.
वाल्मिकी रामायणात दाखवल्याप्रमाणे सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाची चिन्हे असलेला भगवा ध्वज २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर असलेल्या ४२ फूट उंच स्तंभावर फडकवला जाईल. गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, पाच दिवसांचा हा सोहळा २१ नोव्हेंबर रोजी सुरू होईल आणि २५ नोव्हेंबर रोजी ध्वजारोहण समारंभाने संपेल, असं मत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा – प्रत्येक विद्यार्थ्यांनी परीक्षेवेळी लक्षात ठेवा हे सक्सेस मंत्र, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति
ध्वजारोहण समारंभात १०,००० पाहुणे
राम मंदिर ट्रस्टने या कार्यक्रमासाठी पाहुण्यांची संख्या ८,००० वरून १०,००० पर्यंत वाढवली आहे. राम मंदिर संकुलातील इतर सहा मंदिरांमध्ये आणि शेषावतार मंदिरातही ध्वजारोहण होईल. ही भगवान शिव, गणेश, सूर्य, हनुमान, माता भगवती आणि माता अन्नपूर्णा यांची मंदिरे आहेत. राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा म्हणाले की, ध्वजारोहण समारंभात राम मंदिरासह आठही मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि हवन केले जाईल आणि इतर विधी देखील केले जातील.
ध्वज वादळही झेलू शकेल
अयोध्या आणि काशी येथील आचार्य विधी संपन्न करतील. राम मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज-स्तंभ ३६० अंश (degree) फिरणाऱ्या बॉल-बेअरिंगवर आधारित असेल. यामुळे हा ध्वज ६० किमी/तास वेगापर्यंतच्या जोरदार वाऱ्याचा सामना करू शकेल आणि वादळात त्याला कोणतेही नुकसान होणार नाही. ध्वजाच्या कपड्याची गुणवत्ता आणि वादळात त्याची सहनशक्ती याची तपासणी केली जात आहे. ध्वज तयार करणारी एजन्सी २८ ऑक्टोबर रोजी भवन निर्माण समितीच्या बैठकीत तपासणी अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारावर ध्वजासाठी अंतिम कपड्याची निवड केली जाईल.












