Sunetra Pawar Authority Statement : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. विधिमंडळ अध्यक्षपदासाठी अजित पवार यांचे उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांचीच निवड व्हावी, असा निर्णय सर्वानुमते झाल्याचे त्यांनी सांगितले. गटनेता पदासह सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले असून पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडेच देण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ३६ तासांनंतर मोकळा; एका अपघाताने प्रशासकीय नियोजनाची लक्तरे वेशीला
आगामी अर्थसंकल्पाबाबत बोलताना आमदार शेळके म्हणाले की, येणाऱ्या काही दिवसांत अर्थसंकल्प सादर केला जाणार असून तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करतील. मात्र त्यानंतर अर्थ खात्याची जबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारमधील आर्थिक निर्णयप्रक्रियेतही त्यांची भूमिका महत्त्वाची असणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
अलीकडे घडलेल्या घटनेवर सुरू असलेल्या तर्कवितर्कांवर बोलताना शेळके म्हणाले की, यामध्ये कोणताही घातपात नसल्याचे आदरणीय पवार साहेबांनी स्पष्ट केले आहे. पवार साहेबांनी एकदा भूमिका मांडल्यानंतर इतरांनी त्यावर भाष्य करणे योग्य नाही. सध्या तपास योग्य पद्धतीने सुरू असून अशा विषयांवर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलू नये, असेही त्यांनी सांगितले.
पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत त्यांनी स्पष्ट केले की, सध्या कोणताही विलीनीकरणाचा प्रस्ताव आलेला नाही. हे प्रकरण न्यायालयात असून त्यातील तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतील. मात्र अशा परिस्थितीतही आम्ही सर्वजण सुनेत्रा पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहणार आहोत, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.












