Amit Chamola ‘Counter’ video : उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ येथील चिराग मीरचदानी नामक इसमला ला व्याजाने दिलेली रक्कम न दिल्याच्या रागातून ३० वर्षीय तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सावकार असल्याचा आरोप असलेल्या तरुणाने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत हा गुन्हा कट रचून दाखल केल्याचा दावा केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्व येथील रहिवासी चिराग मीरचंदानी (३०) यांनी अमित चमोला याच्याकडून ४ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी अडीच लाख रुपये परत केल्यानंतरही साडेचार लाखांची मागणी केल्याने वाद झाला. नकार दिल्याने ९ फेब्रुवारी रोजी आरोपींनी उल्हासनगर कॅम्प ५ मधील चायनीज सेंटरमध्ये घुसून लोखंडी पाईपने मारहाण करत चिरागचे अपहरण केल्याचा आरोप आहे.
मारहाण, नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढणे व चाकूने धमकी दिल्याचा दावा
पुढे बदलापूर व नंतर माथेरान येथील लॉजमध्ये कोंडून ठेवून मारहाण, नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढणे व चाकूने धमकी दिल्याचा दावा आहे. कुटुंबाकडून सव्वा लाख रुपये घेतल्यानंतर सुटका केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी अमित चमोला, कमल नागदेव व दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित चमोला यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित चमोला यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात चिरागसोबत माथेरानमध्ये फिरताना,सोबत ड्रिंक माकडांना व घोड्यांना खाद्य देताना चिराग दिसतो; तसेच या काळात त्याचा मोबाईल सुरू असल्याचेही दाखवण्यात आले आहे. आम्ही मित्र असल्याने पैसे उधार दिले; वादानंतर गैरसमज मिटला व आम्ही फिरायला गेलो, नंतर परतल्यावर माझ्याविरोधात बोगस गुन्हा दाखल केल्याचा अमितचा दावा आहे. या परस्परविरोधी दाव्यांमध्ये सत्य काय ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून पोलिस तपासातून काय निष्पन्न होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












