Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुकीची घोषणा; शरद पवार पुन्हा वरिष्ठ सभागृहात जाणार?
Top News

राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुकीची घोषणा; शरद पवार पुन्हा वरिष्ठ सभागृहात जाणार?

Rajya Sabha Election

Rajya Sabha Election : निवडणूक आयोगानं 10 राज्यांमधील 37 रिक्त राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. यासाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी अधिकृत निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर नामांकन प्रक्रिया सुरु होईल. उमेदवार 5 मार्चपर्यंत आपलं नामांकन दाखल करू शकतात. मतदान सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर होतील. एप्रिलच्या सुरुवातीला रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

कोणत्या राज्यात किती जागा रिक्त :

या 37 राज्यसभेच्या जागांपैकी महाराष्ट्र सर्वाधिक रिक्त आहे, सात. याव्यतिरिक्त, तामिळनाडू, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी पाच जागा रिक्त असतील. ओडिशातील चार आणि आसाममधील तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. हरियाणा, छत्तीसगड आणि तेलंगणामधील प्रत्येकी दोन जागांसाठी आणि हिमाचल प्रदेशातील एका जागेसाठी मतदान होणार आहे. या जागांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान संपत आहे. नवीन खासदारांना त्यांच्या निवृत्तीनंतर शपथ दिली जाईल.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य :

  • शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)
  • रामदास आठवले (भाजपा)
  • फौजिया खान (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)
  • रजनी पाटील (काँग्रेस)
  • प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना UBT )
  • धैर्यशील पाटील (भाजपा)
  • भागवत कराड (भाजपा)

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यसभेसाठी उमेदवार कोण :

सत्ताधारी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यसभेसाठी उमेदवार ठरल्याची चर्चा आहे. पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेच्या 7 जागांपैकी महायुतीच्या वाट्याला विधानसभेतील संख्याबळानुसार 6 जागा येणार आहे.

शिवसेनेला किती जागा? :

सात राज्यसभा जागांपैकी महायुतीला किमान सहा जागा निश्चित मिळतील, असं सध्याच्या आकड्यांवरुन स्पष्ट होतं. मात्र, या सहा जागांचे वाटप भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कसं होणार, यावर सध्या लक्ष लागलं आहे. राजकीय वर्तुळात भाजपाला चार जागा, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसयांना प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कसं असेल संख्याबळाचं समीकरण? :

राज्य विधानसभेचं सध्याचं संख्याबळ 286 आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळं दोन जागा रिक्त आहेत. राज्यात राज्यसभेची एक जागा निवडून येण्यासाठी 37 आमदारांचा कोटा असेल. सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10, काँग्रेसचे 16 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 असे तीन पक्षांचे मिळून 46 आमदार आहेत. तर माकपा आणि शेकापचे प्रत्येकी एक आमदार आहेत.

महायुतीची खूपच मजबूत :

महाआघाडी एकत्र राहिली आणि या दोघांनी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर एक खासदार निश्चितपणे निवडून जाईल. मात्र, त्या परिस्थितीत ती एक जागा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यापैकी कोणाला द्यायची यावर एकमत करावं लागेल. 37 मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर मविआकडे केवळ 11 मतं शिल्लक असतील. समाजवादी पार्टीचे 2 तर एमआयएमचा एक आमदार सोबत गेला तर 14 मतं अतिरिक्त असतील. याउलट महायुतीची स्थिती खूपच मजबूत आहे. भाजपाचे 131, शिंदेंच्या शिवसेनेचे 57, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) 40 असे मिळून 228 आमदार आहेत. सात आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्यानं हे संख्याबळ 235 इतकं आहे. त्यामुळं महायुतीचे सहा उमेदवार राज्यसभेवर नक्कीच निवडून जातील. भाजपानं सातवा उमेदवार दिला तर निवडणुकीत चुरस होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts