Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाची प्रेरणादायी कहाणी
Top News

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाची प्रेरणादायी कहाणी

Inspiring stories of women
86

Inspiring stories of women : ग्रामीण भागात महिलांनी एकत्र येत उद्योग उभारला तर त्यातून केवळ रोजगारच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण होऊ शकतं. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील उषा देशमुख यांनी याचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. भरडधान्य प्रक्रिया उद्योग उभारून त्यांनी अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पाहूया ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाची ही प्रेरणादायी कहाणी.

पिंजर या छोट्याशा गावातून सुरू झालेला उषा देशमुख यांचा प्रवास आज अनेक महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग ठरला आहे. ज्वारी, बाजरी आणि नाचणीसारख्या भरडधान्यांपासून पौष्टिक पीठ तयार करण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झालेला हा व्यवसाय हळूहळू वाढत गेला. आज त्यांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेसह ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही मागणी वाढत आहे. या पिठांपासून विविध पोषक खाद्यपदार्थही तयार केले जात आहेत.

महिलांना केवळ रोजगारच नाही तर आर्थिक स्वावलंबनाचाही मार्ग मिळाला

पहिल्यांदा ‘भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाच्या’ माध्यमातून अनेक महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं. या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना स्थानिक बाजारात चांगली मागणी मिळू लागली. हळूहळू या उत्पादनांची ओळख जिल्ह्याबाहेरही निर्माण झाली. या उपक्रमामुळे महिलांना केवळ रोजगारच नाही तर आर्थिक स्वावलंबनाचाही मार्ग मिळाला आहे. आज या समूहामुळे अनेक महिलांना घरबसल्या शाश्वत रोजगार उपलब्ध झाला आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहण्याचा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण झाला आहे. महिला दिनाच्या निमित्ताने उषा देशमुख यांची ही कहाणी ग्रामीण महिलांसाठी प्रेरणा देणारी ठरत आहे.

राज्यस्तरीय उद्योजक महिला म्हणून निवड

2023 हे वर्ष भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “भरडधान्य वर्ष” म्हणून जाहीर केलं. यातूनच उषा देशमुख यांनी गावातील महिलांसाठी काही तरी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचं ठरवलं. उषा देशमुख यांच्या पतीने त्यांना या कार्यात भरपूर सहकार्य केलं. मात्र 2024 मध्ये त्यांना देवाज्ञा झाली. मात्र खचून न जाता उषा यांनी अधिक भरारी घेत गेल्या. नुकतीच त्यांची राज्यस्तरीय उद्योजक महिला म्हणून निवड करण्यात आली, तर दिल्ली येथील महिलांच्या राष्ट्रीय स्तरावरिल कार्यक्रमात त्यांचा सत्कारही करण्यात आला.

नाविन्यपूर्ण उद्योग निवडून समोर जात राहण्याचा संदेश

शेतकऱ्यांनी पिकविलेल्या गव्हाची ग्रेडिंग करून शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावल्या बद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्या नाविन्यपूर्ण उद्योग निवडून समोर जात राहण्याचा संदेश देत आहे. समाजाच्या पोषणाची जबाबदारी आणि महिलांची आर्थिक उन्नती या दोन्ही गोष्टी साध्य करणारा हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. उषा देशमुख यांच्या जिद्दीला आणि कर्तृत्वाला सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts