Oil reserves destroyed : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता अधिक भीषण वळणावर पोहोचला असून, इराणची राजधानी तेहरानमध्ये निसर्गाचा एक भयानक आविष्कार पाहायला मिळत आहे. इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये चक्क ‘तेलाचा पाऊस’ पडत असून संपूर्ण शहर काळ्या धुराच्या विळख्यात अडकलंय. इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता केवळ क्षेपणास्त्रांपुरतं मर्यादित राहिले नसून, त्याचे पर्यावरणावरही गंभीर परिणाम होऊ लागले आहेत. तेहरानमध्ये पडलेल्या पावसाने नागरिकांची झोप उडवलीय. हा पाऊस पाण्याचे थेंब नसून तेलाचे अंश घेऊन आला आहे, ज्यामुळे शहरातील इमारती, वाहने आणि रस्ते काळे पडले आहेत.
अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील तेल साठ्यांना टार्गेट केलंय. इराणची राजधानी तेहरानमध्ये तेल साठ्यांवर अमेरिकेकडून भीषण हवाई हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात अनेक तेलसाठे उध्वस्त झाल्याने परिसरात प्रचंड आग आणि धुराचे लोट पसरलेत. इराणच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधांवर झालेला हा पहिलाच मोठा प्रहार मानला जातोय. दक्षिण तेहरानमध्ये झालेल्या स्फोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून बचाव पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.
तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ले
शनिवारी रात्री इस्रायली हवाई दलाने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्म्सच्या इंधन साठवणूक केंद्रांना लक्ष्य केलं. ईशान्य तेहरानमधील अघदासिए तेल गोदाम, शहारन ऑईल डेपो आणि कारजमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात 4 टँकर चालकांचा मृत्यू झाला असून, लागलेली आग विझवण्यासाठी अनेक तास लागले. या आगीतून निघालेल्या प्रचंड काळ्या धुरामुळे आकाशात ढग जमा झाले आणि त्यातून ‘तेलाचा पाऊस’ पडला.
ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य
इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीने नागरिकांसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. या पावसात हायड्रोकार्बन, सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड्सचे प्रमाण जास्त असल्याने तो अत्यंत विषारी आहे….इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने बहारीनमधील एका पाणी शुद्धीकरण प्रकल्पाला ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केलं. बहारीनमध्ये अमेरिकेचे पाचवे नौदल आरमार असल्याने इराणने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
30 इंधन टाक्या आणि 3 तेल डेपोंवर हल्ला
यापूर्वी अमेरिकेने इराणच्या केशम बेटावरील अशाच एका प्रकल्पावर हल्ला केला होता. इस्रायलनं इराणमधील 30 इंधन टाक्या आणि 3 तेल डेपोंवर हल्ला केलाय.. इराणच्या तेल साठ्यांवरील हा पहिला मोठा हल्ला आहे.. तेहरानजवळील हल्ल्यानंतर आकाशात धुराचे लोट उठताना दिसतायत. तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर रस्त्यावरील गटारातही आगीचा भडका उडालाय.
सहा महिने युद्ध लढण्यास सक्षम – इराण
दुसरीकडे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्क्सनं इस्रायलविरोधात कसा आक्रमक पवित्रा घेतलाय. इस्रायलच्या हैफामध्ये एका तेल शुद्धीकरण कारखान्यावर इराणने हल्ला केला असून अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध सहा महिने युद्ध लढण्यास सक्षम असल्याचा दावा IRGC चे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी यांनी केलाय. तर मध्य पूर्वेतील अमेरिका आणि इस्रायली लष्करी तळांवर आणि सुविधांशी संबंधित 200 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केल्याचाही दावा इराणनं केलाय.
खरंतर इस्रायल – अमेरीकेच्या हल्ल्यातून इराणी सरकार तिथल्या लोकाचं संरक्षण करू शकत नाही, हे पटवून देण्यासाठी वारंवार इराणवर हल्ले केले जातायत. त्यातच ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेनंतर तेल साठ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे आखाती युद्धातील काळरात्र इराणनं चांगलीच अनुभवलीय. आता इराण शेवटचा पर्याय म्हणून अमेरिका-इस्रायलविरोधात अण्वस्त्रांचा वापर करणार का ? की त्यांच्यापुढे शरणागती पत्करणार ? याकडे जगाचं लक्ष लागलंय.








