Pami Guru Durbar : राज्यात सध्या खरात प्रकरणावरून खळबळ उडाली असताना आता, ठाण्यात ‘पमी गुरू’चा भोंदूगिरीचा दरबार समोर आलाय, या पम्मी गुरूकडील पोलीस आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीने अंधश्रद्धेला खतपाणी मिळतंय. महाराष्ट्रात एकीकडे विज्ञानाच्या गप्पा मारल्या जात असतानाच, दुसरीकडे नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात ‘पमी गुरू’ नावाच्या एका व्यक्तीने मांडलेल्या भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगावर करोडो रुपयांचे सोने, आलिशान गाड्यांचा ताफा आणि सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या या ‘पमी गुरू’च्या दरबारात चक्क वर्दीतील पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी नतमस्तक होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या खरात फाइल्सनंतर आता कल्याणमध्ये ‘पमी गुरू’ …!
‘पमी गुरू’ नावाच्या तृतीयपंथी गुरूचा मोठा प्रभाव
कल्याणजवळील गोवे नाका परिसरात ‘पमी गुरू’ नावाच्या तृतीयपंथी गुरूचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. सोशल मीडिया, विशेषतः इंस्टाग्राम आणि फेसबुकवर या गुरूचे हजारो रील्स प्रसिद्ध आहेत. या व्हिडिओंमध्ये पमी गुरू गळ्यात सोन्याचे वजनदार हार, हातात जाड सोन्याची कडी आणि अंगावर भरजरी कपडे घालून वावरताना दिसतात. त्यांच्याभोवती महागड्या गाड्यांचा ताफा असतो, जो पाहून सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे आकर्षित होते. स्वतःची श्रीमंती आणि ‘दैवी शक्ती’चा आभास निर्माण करून हा गुरू लोकांच्या श्रद्धेशी खेळत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
अपत्यप्राप्ती साठी पमी गुरूचा आशीर्वाद रामबाण
व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. नोकरी मिळणे, कुटुंबातील अंतर्गत कलह दूर करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘अपत्यप्राप्ती’ यासाठी या गुरूचा आशीर्वाद रामबाण असल्याचे सांगितले जाते. अनेक सुशिक्षित महिला या दरबारात येऊन “केवळ पमी गुरूंच्या कृपेमुळेच आम्हाला मुलं झाली,” असे जाहीरपणे सांगताना व्हिडिओंमध्ये दिसतात. वैद्यकीय विज्ञानाला आव्हान देणारे हे दावे सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत पसरवले जात आहेत. जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असतानाही, अशा प्रकारे उघडपणे ‘चमत्काराचा’ प्रचार होणे हे चिंताजनक मानले जात आहे.
पोलीस कर्मचारी पमी गुरूच्या चरणी लीन
या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे, ज्यांच्यावर अंधश्रद्धा रोखण्याची जबाबदारी आहे, तेच पोलीस अधिकारी या गुरूच्या दरबारात वर्दीवरच आशीर्वाद घेताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये काही पोलीस कर्मचारी पमी गुरूच्या पाया पडताना आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेताना स्पष्टपणे दिसत आहेत. यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून, “जर पोलीसच तिथे जात असतील, तर मग हे सर्व खरेच असेल,” असा समज सर्वसामान्यांमध्ये दृढ होत आहे.
खा. सुरेश म्हात्रेंनी पमी गुरुची भेट घेतल्याचा व्हिडिओ
केवळ पोलीसच नव्हे, तर राजकीय मंडळी देखील या वादातून सुटलेली नाहीत. भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी देखील पमी गुरूची भेट घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे बुवाबाजीला किंवा कथित चमत्कारांना खतपाणी घालणाऱ्या व्यक्तीच्या दरबारात हजेरी लावल्याने त्यांच्यावरही टीकेची झोड उठत आहे.
महाराजा सारखी जीनवनशैली
पमी गुरूचे रील्स हे एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत. करोडो रुपयांचे सोने अंगावर मिरवणे, ‘किंग’ किंवा ‘महाराजा’ सारखी जीवनशैली दाखवणे हा या भोंदूगिरीचा एक भाग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लोकांच्या मनात आदरापेक्षा भीती आणि आश्चर्याची भावना निर्माण करून त्यांना भुलवले जाते. या व्हिडिओंच्या माध्यमातून एक प्रकारचे ब्रँडिंग केले जाते, जेणेकरून संकटात सापडलेला माणूस या झगमगाटाला भुलून तिथे धाव घेतो.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आधीच आक्रमक झाली आहे. आता कल्याणमधील या प्रकरणावरही अंनिसने संताप व्यक्त केला आहे. “सुशिक्षित महिलांनी आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे चमत्कारांच्या मागे लागणे हे राज्यासाठी घातक आहे. मुलांचा जन्म हा पूर्णपणे जीवशास्त्रीय प्रक्रिया आहे, त्यात कोणत्याही गुरूचा आशीर्वाद काम करत नाही. अशा प्रकारच्या दाव्यांमुळे समाजाची फसवणूक होत आहे,” असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.












