Pune Crime | एकिकडे नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांच्या विश्वासाचा फायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर आता दुसरीकडे पुण्यातही असाच एक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या खेड (Khed) तालुक्यातील एका नवीन भोंदूबाबाचा काळा कारनामा समोर आला आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना खेडमध्ये घडली आहे.
हेही वाचा – इंडोनेशिया थरारलं! 7.4 तीव्रतेचा भूकंप अन् त्सुनामीचा फटका, एकाचा दुर्दैवी मृत्यू
दोष निवारण करण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण
चांडोली येथील शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी (Navnath Gawali) नावाच्या भोंदूबाबाने महिलांच्या श्रद्धेचा फायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 34 वर्षीय महिलेने भोंदू नवनाथ गवळीविरोधात खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, शिवदत्त आश्रमात नवनाथ गवळी हा महाराज म्हणून मिरवत होता. अनेक लोक त्यांच्या समस्या घेऊन गवळीकडे जात होते. तर मे 2025 पासून पीडित महिला ही आपल्या कुटुंबासह आश्रमात जात होती. त्यानंतर 17 जुलै 2025 रोजी पहाटेच्या वेळी जप करत असताना भोंदू नवनाथ गवळीने महिलेचा विनयभंग केला. तसेच तुझ्या अंगातील दोष दूर करायचे असतील तर तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी मागणी गवळीने पीडित महिलेकडे केली होती.
कुटुंबाच्या भितीपोटी महिलेने संपूर्ण सत्य लपवले होते. मात्र, आरोपी गवळी पीडित महिलेला वारंवार फोन करून त्रास देत होता. त्यानंतर खरात प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने धैर्याने पोलीस स्थानकात जाऊन आरोपी गवळीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर पोलिसांनी भोंदू गवळीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात काही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आश्रमामध्ये महिलांच्या अंगात येण्याचे प्रकार घडवून आणले जात होते. तसेच महिलांमध्ये वेगळी शक्ती असल्याचं त्यांना भासवत त्यांच्या मनावर ताबा मिळवत आणि दोष निवारण करतो असं सांगत त्यांचे लैंगिक शोषण नवनाथ गवळी करत होता.
दरम्यान, खेड पोलिसांनी आरोपी नवनाथ गवळीवर गुन्हा दाखल केला आहे. तर सध्या आरोपी गवळी फरार आहे. त्यामुळे पोलीस या घटनेचा कसून तपास करत असून आरोपी गवळीचा शोध घेत आहेत. या घटनेनं खेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.











