environment destruction : प्रगती आणि विकास हवाच, पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी (A Victim of the Environment) देणं किती योग्य आहे? भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) मुजबी ते भंडारा महामार्गाच्या रुंदीकरणाचे (Highway Widening) काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र, या विकासाच्या वेगात सुमारे शंभर ते दीडशे वर्षांपासून सावली देणाऱ्या महाकाय वृक्षांचा श्वास गुदमरला आहे. शेकडो झाडे कापली (Hundreds of trees were cut down) जात असल्याने निसर्गप्रेमी आणि स्थानिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
हेही वाचा – मुंबईत भाड्यानं घर शोधणं होईल सोपं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय
भंडारा जिल्ह्यातील महामार्गाच्या ‘चौपदरीकरणाच्या’ नावाखाली निसर्गाचा अनमोल ठेवा उद्ध्वस्त केला जात आहे. मुजबी ते भंडारा दरम्यानच्या ५ किलोमीटर अंतरावर वर्षानुवर्षे उभी असलेली कडुनिंबाची आणि इतर औषधी झाडे आता जमिनीवर लोळताना दिसत आहेत. सुमारे १०० ते १५० वर्षांपासून प्रवाशांना सावली देणारी ही झाडे आता कायमची इतिहासजमा होत आहेत.
पोटाची खळगी भरणारे छोटे व्यावसायिकही उघड्यावर
केवळ पर्यावरणच नाही, तर या झाडांच्या सावलीत आपली पोटाची खळगी भरणारे छोटे व्यावसायिकही उघड्यावर आले आहेत. चहाच्या टपऱ्या, फळविक्रेते, आणि कारागीर यांच्या डोक्यावरचे सावलीचे छत्र हरवले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक सुसाट होईल हे खरं, पण यामुळे निर्माण झालेला रोजगाराचा प्रश्न आणि पर्यावरणाची हानी कशी भरून निघणार, हा मोठा प्रश्न आहे.
आरटीओ ऑफिसपर्यंतची आणखी ७० झाडे कुऱ्हाडीच्या प्रतीक्षेत
आतापर्यंत ८० ते ९० झाडे कापली गेली असून, जुना नागपूर नाका ते आरटीओ ऑफिसपर्यंतची आणखी ७० झाडे कुऱ्हाडीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये शिसम, निलगिरी, पिंपळ आणि कडुनिंबाच्या झाडांचा समावेश आहे. निसर्गप्रेमींमध्ये याबद्दल प्रचंड नाराजी असून, प्रशासनाने केवळ रस्ते न बांधता पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
यामुळे मोठ्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागू शकते
महामार्ग विस्तारामुळे प्रवास सुखकर होईल यात शंका नाही, पण ही ‘सुखमय’ वाटचाल निसर्गाचा बळी देऊन होणार असेल, तर येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागू शकते. आता प्रशासन या वृक्षतोडीच्या बदल्यात किती नवीन झाडे लावते आणि त्यांचे संगोपन करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












