Fly91 Solapur Hyderabad: सोलापूरहून हैदराबादकडे जाणारी नवीन विमानसेवा शुक्रवार, १७ एप्रिलपासून सुरू झाली आहे. या सेवेमुळे सोलापूरकरांना केवळ ६० ते ६५ मिनिटांत हैदराबादला पोहोचणे शक्य झाले आहे. पहिल्याच दिवशी सुमारे २५ प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतला.
पहिल्या उड्डाणादरम्यान प्रवाशांचे गुलाबपुष्प आणि लाडू देऊन स्वागत करण्यात आले. तसेच काही प्रवाशांना विशेष स्मरणीय अनुभव देण्यासाठी स्थानिक संस्थांच्या वतीने उपक्रम राबवण्यात आले.
हेही वाचा: मोठी बातमी! EPFO वेबसाइटवर बंद झाली सुविधा; आता ‘या’ अॅपवरून घरबसल्या बनवा UAN, पाहा कसं वापरायचं?
विमानसेवेचे वेळापत्रक आणि मार्ग
ही सेवा आठवड्यातून पाच दिवस सुरू राहणार असून शनिवार व रविवार वगळण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ही थेट सेवा नसून गोवा–सोलापूर–हैदराबाद या टप्प्यांमध्ये चालवली जाते.
Fly91 कंपनीचे विमान गोव्याहून सोलापूरला येते, सुमारे २०–२५ मिनिटांचा थांबा घेऊन पुढे हैदराबादकडे जाते. त्यानंतर पुन्हा सोलापूरमार्गे गोव्याकडे परतण्याचे वेळापत्रक आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार
दुपारी १:४५ – गोवा येथून सोलापूरकडे उड्डाण
सुमारे ३:०० – सोलापूर येथे आगमन
२० मिनिटांनंतर – हैदराबादकडे प्रस्थान
सायं. ४:२५ – हैदराबाद आगमन
१५ मिनिटांनंतर – पुन्हा सोलापूरकडे परत
सायं. ५:५० – सोलापूर आगमन
सायं. ६:१० – गोव्याकडे पुन्हा उड्डाण
पहिल्या दिवशी विशेष उपक्रम
उद्घाटनाच्या दिवशी
उद्घाटनाच्या दिवशी काही विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिला विमानप्रवास करण्याची संधी मिळाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रवाशांना नाश्त्यासाठी मिठाईचे बॉक्स देण्यात आले आणि केक कापून या सेवेला औपचारिक सुरुवात करण्यात आली.
शहरासाठी नवी कनेक्टिव्हिटी
ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे सोलापूरचे हैदराबाद, गोवा आणि पुढे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मार्गांशी जोडले जाणे अधिक सुलभ झाले आहे. यामुळे व्यवसाय, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.











