Yavatmal Girls Missing: अमरावतीनंतर आता यवतमाळमधूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चक्क एक-दोन नव्हे, तर तब्बल 34 अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरातून गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३४ मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणामागे आंतरराज्यीय मानवी तस्करी आणि फसवणुकीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून प्रशासनाने यावर कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा: सोनं-चांदीच्या दरात हलकी घसरण; खरेदीदारांसाठी दिलासा! जाणून घ्या 20 एप्रिलचे नवे दर
प्रकरण काय आहे?
भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी हा विषय चव्हाट्यावर आणला. त्यांच्या दाव्यानुसार, राळेगाव तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील ३४ मुली एकामागून एक बेपत्ता झाल्या आहेत. सुरुवातीला या मुली आदिवासी समाजातील असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु तपासात यातील अनेक मुली हिंदू समाजातील विविध घटकांतील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आमिष आणि फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, काही गुन्हेगारी टोळ्या या मुलींना आणि त्यांच्या पालकांना लग्नाचे आमिष किंवा चांगल्या पगाराच्या नोकरीचे प्रलोभन दाखवून जाळ्यात ओढतात. यासंदर्भात एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये मुलींना कशा प्रकारे भुलवून बाहेर नेले जाते, याचे धक्कादायक तपशील आहेत. काही प्रकरणांमध्ये या मुलींना परराज्यात नेऊन त्यांचे जबरदस्तीने विवाह लावून दिले जात असल्याचे किंवा त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचे गंभीर आरोप सामाजिक संघटनांनी केले आहेत.
पोलीस कारवाई आणि अटकसत्र
या घटनेचे गांभीर्य ओळखून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस तपासादरम्यान आतापर्यंत खालील बाबी समोर आल्या आहेत:
१५ जणांना अटक: पोलिसांनी या रॅकेटमध्ये सामील असल्याच्या संशयावरून मजहर कुरेशी या मुख्य संशयितासह १५ जणांना ताब्यात घेतले आहे.
दोन टोळ्यांचा सहभाग: प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, दोन वेगवेगळ्या टोळ्या या भागात सक्रिय आहेत.
विशेष पथक: उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) रॉबिन बन्सल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक बेपत्ता मुलींचा शोध घेत आहे.
राळेगावमध्ये तणावाचे वातावरण
या प्रकरणाचे पडसाद स्थानिक स्तरावर उमटत आहेत. मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. भाजप, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने राळेगावमध्ये निषेध मोर्चे काढण्यात आले.
प्रशासनाचे आवाहन
पोलीस प्रशासनाने पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या अमिषाला बळी पडू नये आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.
बेपत्ता असलेल्या ३४ मुलींपैकी नेमक्या किती मुली सुखरूप परततील आणि या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.












