KEM Hospital Name Change | मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध केईएम हॉस्पिटलचे (KEM Hospital) नाव बदलण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. केईएम म्हणजेच ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ असं या रूग्णालयाचं नाव आहे. तर आता भाजप पक्षाचे नेते, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी या रूग्णालयाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबई पालिकेला पत्र देखील पाठवले आहे.
हेही वाचा – मोठा दिलासा! होर्मुझ सामुद्रधुनी पार करून ‘देश गरिमा’ तेलवाहू जहाज भारतात दाखल
मंगलप्रभात लोढा यांनी केईएम हॉस्पिटलचे नाव बदलण्याची केली मागणी? कोणतं नवीन नाव सुचवलं?
मंगलप्रभात लोढा यांनी पालिकेला पत्र पाठवले असून त्यांनी केईएमचे नाव ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रूग्णालय’ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता केईएम रूग्णालयाचे नाव बदलण्याची पुन्हा एकदा मागणी केली जात असून हे हॉस्पिटल चांगलेच चर्चेत आले आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
मंगलप्रभात लोढा यांनी पालिकेल्या लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केईएमचे नाव इंग्रजी असून ते ब्रिटीशांच्या काळातील नाव आहे. त्यामुळे या हॉस्पिटलचे नाव बदलण्यात यावे. या हॉस्पिटलचे नाव ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रूग्णालय’ करावे. आपला देश समृद्ध स्वदेशी वारसा गौरवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण सार्वजनिक संस्थांची नावं पुनर्विचारात घेणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे. अजूनही काही अनेक संस्था आहेत ज्या वसाहतवादी काळातली नावे वापरत आहेत, जी दास्याच्या काळाची आठवण करून देत आहेत. या नावांची जागा आपल्या मूल्यांना, संस्कृती आणि प्रेरणादायी ऐतिहासिक व्यक्तींना सन्मान देणाऱ्या नावांनी घेतली पाहिजे. तर या संदर्भात किंग एडवर्ड मेमोरियल रूग्णालय या मुंबईतील संस्थेचे नामकरण झाले तर भारताचा इतिहास आणि संस्कृतीतून निवडलेले नाव भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देईल, असं लोढा यांनी म्हटलं आहे.
याआधीही लोढा यांनी जानेवारी 2026 मध्ये केईएम हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमात नाव बदलण्याची मागणी केली होती. तर आताही त्यांनी पालिकेला पत्र पाठवत या रूग्णालयाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या रुग्णालयाच्या नावावरून वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












