Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • तटकरे, भाजप अन् डीलिमिटेशन; रोहित पवारांचा चौफेर हल्लाबोल, म्हणाले ‘धाडस महागात…’
ताज्या बातम्या

तटकरे, भाजप अन् डीलिमिटेशन; रोहित पवारांचा चौफेर हल्लाबोल, म्हणाले ‘धाडस महागात…’

Rohit Pawar
Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विद्यार्थी प्रश्न, सुनील तटकरे, अर्थखातं आणि डीलिमिटेशनवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. विद्यार्थी प्रश्न, सुनील तटकरे (Sunil Tatkare) , अर्थखातं, प्रशांत किशोर, डीलिमिटेशन, मराठा आरक्षण आणि सत्ताधारी पक्षांच्या भूमिकांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगत डीलिमिटेशनच्या मुद्द्यावर त्यांचा विरोध कायम राहणार असल्याचा दावा केला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून रोहित पवार आक्रमक

पुण्यात विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत आयोजित करण्यात आलेल्या संवाद कार्यक्रमाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि विविध विद्यार्थी संघटना एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

पेपरफुटीच्या घटना आणि CET परीक्षेतील कथित गैरप्रकारांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अशा परिस्थितीत काय करायचं, असा सवाल त्यांनी केला. याच प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हा संवाद आयोजित करण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलं.

सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर रोहित पवारांचं भाष्य

सुनील तटकरे आणि विविध नेत्यांच्या भेटीगाठींबाबत बोलताना रोहित पवार यांनी प्रत्येक पक्षाला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं.

“कोणी कोणाला भेटायचं, हे संबंधित पक्ष ठरवतील. काकींना कोणीही भेटणं हा त्यांच्या पक्षाध्यक्षांचा मान-सन्मान आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

प्रशांत किशोर यांच्या भेटीवरूनही त्यांनी भाष्य केलं. प्रशांत किशोर यांची भेट घेतल्यानंतर भाजप नाराज होऊ शकतो, हे माहिती असतानाही जर एखाद्या पक्षातील नेत्यांनी त्यांना बोलावलं असेल, तर त्यातून संबंधित नेत्यांचं धाडस दिसून येतं, असं पवार म्हणाले.

भाजपच्या विरोधात जाणं सोपं नसल्याचं सांगत, हे धाडस भविष्यात महागात पडू शकतं, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. (Maharashtra Politics)

‘अर्थखातं मिळणं भाजपला आणि शिंदेंना मान्य नसावं’

राज्याच्या अर्थखात्याबाबतही रोहित पवार यांनी मोठं विधान केलं. राष्ट्रवादीला हे महत्त्वाचं खातं मिळेल असं आपल्याला वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

अर्थखातं हातात आलं तर सरकारच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर प्रभाव पडतो. त्यामुळे हे खातं अजित पवारांच्या पक्षाकडे जाणं भाजप आणि एकनाथ शिंदे यांना कदाचित मान्य नसावं, असा दावा त्यांनी केला.

अजित पवार आज नसते तर आपण सर्वांनी मिळून भाजपला मोठं आव्हान दिलं असतं, असंही रोहित पवार म्हणाले. अजित पवार यांची पूर्वीची भाजपविरोधी भूमिका त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

प्रशांत किशोरांवरून तटकरेंवर टोला

प्रशांत किशोर यांच्याबाबत सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तटकरे यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टीका करताना अप्रत्यक्षपणे पार्थ पवार यांच्यावर नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधल्याचं पवार म्हणाले.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रचार आणि रणनीतीमध्ये प्रशांत किशोर यांची भूमिका महत्त्वाची होती, असा दावा त्यांनी केला.

तसेच, एखादा कन्सल्टंट आपल्या पसंतीचा नसल्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे का, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला. अजित पवारांना पसंत नसलेल्या एका कन्सल्टंटबाबतही पक्षातील मतभेद असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

‘पदाचा योग्य वापर करून धाडसी निर्णय घ्या’

सपकाळ यांच्या वक्तव्यावर बोलताना रोहित पवार यांनी सत्तेतील नेत्यांना आपल्या पदाचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला.

विरोधक काहीही बोलू शकतात; मात्र सत्तेत असलेल्या व्यक्तींनी आपल्या कामातून ते सिद्ध करून दाखवणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं.

तुमच्याकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. या पदाचा योग्य वापर करून धाडसी निर्णय घेता येतात, हे जनतेला दाखवून द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

डीलिमिटेशनवर रोहित पवारांची स्पष्ट भूमिका

देशातील आगामी राजकीय घडामोडींकडे सर्वांचं लक्ष आहे. डीलिमिटेशनच्या (Delimitation) मुद्द्यावर संसदेत कोणता पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करतो, हे महत्त्वाचं ठरणार असल्याचं रोहित पवार म्हणाले.

आपल्या पक्षाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मतदारसंघातील कामांसाठी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, डीलिमिटेशनच्या मुद्द्यावर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचं पवार यांनी नमूद केलं.

“माझा आमच्या सर्व खासदारांवर पूर्ण विश्वास आहे. माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार डीलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील,” असं रोहित पवार म्हणाले.

मतदानाच्या दिवशी कोणता पक्ष कोणत्या बाजूने उभा राहतो, हे स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितलं. आपल्या भूमिकेत आपण आजपर्यंत बदल केलेला नाही आणि पुढेही भूमिका बदलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणावरही सरकारवर निशाणा

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरही रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. आरक्षण न्यायालयात टिकवायचं असेल तर त्यासाठी संसदेत घटनात्मक बदल करण्याची गरज असल्याची भूमिका आपण यापूर्वीच मांडली होती, असं त्यांनी सांगितलं.

सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेकदा दिशाभूल केली आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाली, असा आरोप त्यांनी केला. या परिस्थितीचा राजकीय फायदा केवळ भाजपने घेतल्याचंही पवार म्हणाले.

भाजप हा सामाजिक एकोपा लक्षात घेऊन काम करणारा पक्ष नसून मतांचं विभाजन करून निवडणुकीत फायदा कसा मिळवता येईल, याचा विचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केलं असून आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण सुरू ठेवल्याची टीकाही रोहित पवार यांनी केली.

एकूणच, रोहित पवार यांच्या या वक्तव्यांमुळे विद्यार्थी प्रश्नांपासून ते डीलिमिटेशन आणि मराठा आरक्षणापर्यंत अनेक मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts