Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे-नाशिक रेल्वेसाठी चक्काजाम; सिन्नरमध्ये तांबे पोलिसांच्या ताब्यात, तर संगमनेरमध्ये थोरातांच्या नेतृत्वात आंदोलन
महाराष्ट्र

पुणे-नाशिक रेल्वेसाठी चक्काजाम; सिन्नरमध्ये तांबे पोलिसांच्या ताब्यात, तर संगमनेरमध्ये थोरातांच्या नेतृत्वात आंदोलन

Pune Nashik Railway
Pune Nashik Railway: नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलनाला जोर आला आहे.

सिन्नर, संगमनेर आणि मंचर या ठिकाणी नागरिक आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. सिन्नरमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांनी सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतल्याने वातावरण अधिक तापलं.

सिन्नरमध्ये समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. पुणे-नाशिक रेल्वेचा (Pune Nashik Railway) मार्ग अहिल्यानगरमार्गे वळवण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि आंदोलकांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.

हेही वाचा: NEET वाद, विद्यार्थी आंदोलन अन् राजीनामा; धर्मेंद्र प्रधानांनी २ आठवड्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

सत्यजित तांबे पोलिसांच्या ताब्यात

सिन्नरमध्ये समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. यावेळी सत्यजित तांबे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलकांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्वीच्या प्रस्तावित मार्गानेच व्हावा, अशी मागणी केली.

दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan) यांनी सत्यजित तांबे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. रेल्वे मार्गाबाबत नेमलेल्या समितीने केवळ तांत्रिक बाबींचा विचार न करता स्थानिक नागरिकांच्या भावना आणि अडचणींचाही विचार करावा, अशी मागणी तांबे यांनी केली.

‘निकाल ६० दिवसांत लागला पाहिजे’

सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी समितीची सुनावणी गावागावात घेण्याची मागणी केली. तसेच या संपूर्ण प्रक्रियेला निश्चित कालमर्यादा असावी आणि ६० दिवसांच्या आत निर्णय झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावर गिरीश महाजन यांनी तांबे यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, असं आश्वासन दिलं. समिती गावागावात पोहोचेल आणि संबंधित सर्व बाबींचा विचार केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

तांबे यांनी यावेळी आपल्याला केवळ तोंडी आश्वासन नको, तर मागण्यांबाबत लेखी स्वरूपात माहिती द्यावी, अशी मागणी केली. त्यावर महाजन यांनी लेखी देण्याबाबत शब्द दिल्याचं सांगितलं.

‘आंदोलन भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी’

सरकारने समिती नेमली असताना आंदोलन का केलं जात आहे, असा प्रश्न सरकारकडून उपस्थित करण्यात आला होता. त्यावर सत्यजित तांबे यांनी हे आंदोलन समितीच्या विरोधात नसून स्थानिक नागरिकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी असल्याचं स्पष्ट केलं.

संगमनेरमध्ये थोरातांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

दरम्यान, संगमनेरमध्येही पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती मिळावी आणि प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत स्थानिकांच्या मागण्यांचा विचार व्हावा, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

मंचरमध्येही नागरिक रस्त्यावर

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथेही पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. LS Marathi News Channel

यावेळी ‘वंदे भारत अमर रहे’ अशा घोषणा देत आंदोलकांनी रेल्वे प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची मागणी केली.

सिन्नरमध्ये पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यात आलं, तर संगमनेर आणि मंचरमध्येही आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts