Raj Thackeray: रायगड दौऱ्यात राज ठाकरेंनी रस्त्यांची कामं, भूसंपादन आणि ‘तिसरी मुंबई’च्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रायगड दौऱ्यादरम्यान रस्त्यांची कामं, भूसंपादन, ‘तिसरी मुंबई’ आणि कोकणातील विकासाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता विकास प्रकल्प राबवले जात असल्याचा आरोप करत त्यांनी शेतकऱ्यांना जमिनी विकण्याऐवजी भविष्यातील विकासात भागीदार होण्याचं आवाहन केलं.
हेही वाचा: तटकरे, भाजप अन् डीलिमिटेशन; रोहित पवारांचा चौफेर हल्लाबोल, म्हणाले ‘धाडस महागात…’
‘स्थानिक आमदारांच्या हस्तक्षेपामुळे रस्त्यांची कामं रखडली’
रायगडमधील रस्त्यांच्या कामांवर भाष्य करताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्थानिक आमदारांच्या हस्तक्षेपाचा आरोप केला. रस्त्यांची कामं वेळेत पूर्ण होत नसल्याने काही ठेकेदार कंटाळून निघून गेल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा त्यांनी केला.
भूसंपादनाची जबाबदारी सरकारने पार पाडली पाहिजे, मात्र ही प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. नव्याने बांधलेल्या रस्त्यांची अवस्था पाहता कामाच्या गुणवत्तेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
“माझ्या राज्यातील रस्ते चांगले झाले पाहिजेत. मात्र कामापेक्षा टक्केवारी किती मिळेल, याकडे अधिक लक्ष दिलं जातं,” असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
‘तिसरी मुंबई’ नेमकी कोणासाठी?
‘तिसरी मुंबई’च्या घोषणेवरूनही राज ठाकरे यांनी सरकारला सवाल केला. या प्रकल्पातून नेमकं काय आणलं जाणार आहे आणि त्याचा फायदा कोणाला होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर विकल्या जात असल्याचा दावा करत त्यांनी पुण्याच्या वाढत्या शहरीकरणाचाही दाखला दिला. महाराष्ट्रासोबतच कोकणातही जमिनी विकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं ते म्हणाले.
कोकणाचा विकास व्हावा, याला आपला विरोध नसल्याचं स्पष्ट करताना स्थानिक नागरिकांच्या जीवावर विकास लादला जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘स्थानिकांना अंधारात ठेवू नका’
कोकणातील मोठ्या प्रकल्पांबाबत स्थानिकांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. सर्व निर्णय उद्योगपती आणि मोठ्या व्यावसायिकांच्या फायद्यासाठी घेतले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
स्थानिकांनी केवळ पत्रकार परिषद घेण्याऐवजी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच काही राजकीय कुटुंबांभोवतीच स्थानिक राजकारण फिरत असल्याची टीकाही त्यांनी केली.
निवडणुकांमध्ये पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत अशाच पद्धतीने महाराष्ट्राचा विकासाचा मार्ग ठरला तर राज्याच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतील, असं राज ठाकरे म्हणाले.
‘जमिनी विकण्याऐवजी उद्योगात भागीदार व्हा’
शेतकऱ्यांनी विकासाला विरोध करण्याऐवजी त्यात आपला वाटा निर्माण केला पाहिजे, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. “जमिनी विकू नका, उद्योगांमध्ये भागीदार व्हा,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
यासाठी त्यांनी पुण्यातील मगरपट्टा सिटीचं उदाहरण दिलं. शेतकरी आणि विकासकांनी एकत्रितपणे विकास केल्याने स्थानिकांना त्याचा फायदा मिळू शकतो, असं त्यांनी सांगितलं.
कोकणात पुढील काळात कोणत्या प्रकारचा विकास होणार, याचा विचार स्थानिकांनी आतापासूनच केला पाहिजे. विकासाला विरोध नसून विकासाच्या प्रक्रियेत स्थानिकांना सहभागी करून घ्या आणि त्यांना अंधारात ठेवू नका, हा आपला मुख्य मुद्दा असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
आता ‘तिसरी मुंबई’ आणि कोकणातील प्रस्तावित विकासाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक, शेतकरी आणि मतदार यांची भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागलं आहे.









