Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • नीला विखे पाटील स्वीडनची खासदार; महाराष्ट्राशी नातं असलेल्या लेकीची ऐतिहासिक राजकीय भरारी
राजकारण

नीला विखे पाटील स्वीडनची खासदार; महाराष्ट्राशी नातं असलेल्या लेकीची ऐतिहासिक राजकीय भरारी

Nila Vikhe Patil
0

Nila Vikhe Patil : विखे पाटलांच्या घरातली पोरगी खासदार झाली, पण महाराष्ट्रात नाही तर स्वीडनमध्ये, विखे पाटलांच्या घरातून एक अशी लेक जन्माला आली जिने थेट सातासमुद्रापार युरोपच्या थंडीत महाराष्ट्राचा डंका वाजवलाय. अहिल्यानगरच्या मातीतील मातब्बर राजकीय घराणं म्हणून विखे घराण्याला ओळखल जातं, मात्र आता विखे पाटलांची ताकद स्वीडनमध्ये सुद्धा वाढलीये, मात्र हि ताकद वाढतानाच विखे कुटुंबातला जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे भाऊ अशोक विखे पाटीलांची हि मुलगी नीला, मात्र नीलाच्या वडिलांचे आणि राधाकृष्ण विखे पाटलांचे कट्टर वाद, मोठा मुलगा असूनही वडिलांना अग्नी देऊ दिला नाही असा आरोप त्यांनी भावावर केला, काय आहे हा वाद आणि नीला कशी बनली स्वीडनची खासदार पाहूयात….

नीला विखे पाटील कोण आहेत? ( Nila Vikhe Patil )

आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना ज्यांनी काढला, ते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील या घराण्याचे मूळ पुरुष. त्यांचे चिरंजीव म्हणजे देशाचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील. त्यावेळच्या अहमदनगर आणि आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यात या कुटुंबाचा शब्द म्हणजे अंतिम शब्द असायचा. हजारो एकरवर पसरलेलं शैक्षणिक साम्राज्य, साखर कारखाने, मुळा-प्रवरा संस्था आणि गडगंज श्रीमंती. पण म्हणतात ना, जिथं सत्तेचं अथांग पाणी असतं, तिथं वादाचे मगरींचे सुळसुळाटही असतात. बाळासाहेब विखे पाटील जिवंत असेपर्यंत सगळं काही कसं एका धाग्यात बांधलेलं होतं. पण २०१६ मध्ये जेव्हा बाळासाहेबांचं निधन झालं, तेव्हा या गडगंज घराण्याची अब्रू चव्हाट्यावर आली….

बाळासाहेबांना तीन मुलं. थोरलेअशोक विखे पाटील, जे खूप मोठे शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि नीलाचे वडील आहेत. मधले म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील, जे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचे मोठे मंत्री आहेत. आणि तिसरे धाकटे राजेंद्र विखे पाटील. बाळासाहेबांच्या जाण्यानंतर थोरले अशोक विखे आणि धाकटे राजेंद्र विखे एकत्र आले आणि ते राधाकृष्ण विखेंच्या विरोधात गेले. वाद काय होता? तर संपत्ती आणि संस्थांच्या अधिकाराचा. डॉ. अशोक विखेंचा आरोप होता की, ते जेव्हा शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी स्वीडनला गेले होते, तेव्हा राधाकृष्ण विखेंनी राजकारणाचा आणि सत्तेचा वापर करून धर्मादाय आयुक्तांच्या मदतीने फसवणूक केली आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा आणि इतर ट्रस्टचा ताबा बेकायदेशीरपणे स्वतःकडे घेतला. हा वाद फक्त कोर्टापुरता मर्यादित राहिला नाही. अशोक विखेंनी थेट समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि सख्ख्या भावाच्या संस्थांमध्ये १४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करून चौकशीची मागणी केली.

हेही वाचा : देश आर्थिक संकटात? मोदींच्या वाढदिवसावर किती खर्च?

महाराष्ट्रातील विखे पाटील कुटुंबाशी खास नातं

पण या सगळ्या वादात सर्वात वेदनादायी वळण तेव्हा आलं, जेव्हा डॉ. अशोक विखे पाटील यांनी एका जाहीर सभेत राधाकृष्ण विखेंवर आरोप केला. की, मी या घराण्याचा थोरला मुलगा असूनही, मला माझ्या वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देऊ दिला गेला नाही. ज्या घरातून जिल्ह्याचं राजकारण चालत होतं, त्याच घराच्या दारात वडिलांच्या सरणावर अग्नी कोणी द्यायचा, यावरून सख्ख्या भावांमध्ये टोकाचा वाद झाला. या एका घटनेने विखे पाटील कुटुंबात अशी भिंत उभी केली, जी कधीही सांधली जाणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं. राजकारणातही दोघं एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा राधाकृष्ण विखेंचे सुपुत्र सुजय विखे पाटील भाजपच्या तिकिटावर उभे राहिले, तेव्हा त्यांचे सख्खे काका अशोक विखे यांनी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला.

स्वीडनच्या संसदेत कशी पोहोचल्या नीला विखे पाटील? ( Sweden Parliament )

याच वादाच्या आणि संघर्षाच्या वातावरणात नीला विखे पाटील नावाचं एक वादळ आकाराला येत होतं. नीला यांचे वडील डॉ. अशोक विखे यांनी स्वीडनमधील एक चित्रकार आणि शिक्षिका असलेल्या इवा-लिल निल्सन यांच्याशी लग्न केलं. नीला यांचा जन्म १९८५ मध्ये स्वीडनमध्ये झाला, पण त्यांचे सुरुवातीचे बालपण मात्र अहिल्यानगरच्या मातीत गेलं. तिथे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. पण जेव्हा घरातले वाद वाढायला लागले, तेव्हा वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांना आणि त्यांच्या आईला स्वीडनला पाठवून दिलं. स्वीडनमधील कुंगस्लेना नावाच्या ग्रामीण भागात नीला आणि त्यांच्या बहिणी वाढल्या. एका बाजूला महाराष्ट्रातील गडगंज राजकीय घराण्याची पार्श्वभूमी आणि दुसऱ्या बाजूला स्वीडनमधलं साधं, शिस्तबद्ध जीवन. या दोन्ही संस्कृतींमध्ये नीला घडत गेल्या.

पण नीला यांच्यावर सर्वात मोठा प्रभाव होता तो त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटलांचा. नीला जेव्हा १५ वर्षांची होती, तेव्हा अशोक विखे पाटील म्हणजे आजोबांनी तिला महाराष्ट्राचा अर्थसंकल्पशिकवला होता, तिथपासूनच नीलाच्या डोक्यात राजकारण, समाजकारण आणि अर्थशास्त्राची पहिली ठिणगी पडली. नीलाने स्वीडनच्या गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली, पुढे जाऊन एमबीए पूर्ण केलं आणि प्राइस वॉटर हाऊस कूपर्स सारख्या जगातील सर्वात मोठ्या वित्तीय सल्लागार कंपनीत काम करायला सुरुवात केली. नीलाने १६ व्या वर्षी तिथल्या पर्यावरणवादी विचारसरणीच्या ग्रीन पार्टी मध्ये प्रवेश केला. स्वीडिश यंग ग्रीन्स आणि ग्रीन स्टुडंट्स सारख्या संघटनांमध्ये नेतृत्व करत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून त्या आधी स्टॉकहोम महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या.

महाराष्ट्राशी नातं जपणारी स्वीडनची खासदार ( Nila Vikhe Patil )Sweden Parliament

पुढे स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांनी नीला विखे पाटील यांची थेट आपल्या पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती केली. ग्रीन पार्टीने नीला यांच्या १५ वर्षांच्याअनुभवाची दखल घेतली आणि त्यांना स्टॉकहोम सिटी या मतदारसंघातून संसदेची उमेदवारी दिली. स्वीडनच्या मतदारांनी नीलाला प्रचंड बहुमताने विजयी करून स्वीडनच्या संसदेत पाठवलं. नीला विखे पाटील ३४९ सदस्यांच्या या संसदेत पोहोचणाऱ्या पहिल्या मराठी महिला ठरल्या.

ज्या भावांनी एकमेकांचे चेहरे बघणं सोडलं होतं, त्या घराण्यात या लेकीच्या यशाने एक विलक्षण वळण आणलं. नीला यांच्या या ऐतिहासिक विजयानंतर, महाराष्ट्राचे मंत्री आणि त्यांचे सख्खे काका राधाकृष्ण विखे पाटलांनी सोशल मीडियावर पोस्ट करत. माझी पुतणी नीला हिने स्वीडनच्या संसदेत मिळवलेला विजय हा आमच्या संपूर्ण विखे पाटील परिवारासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, माझे बंधू अशोक पाटील यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेली मेहनत आज सार्थकी लागली आहे. असं म्हटलंय… तर नीलाचे चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांनीही जुनी कटुता विसरून आपल्या बहिणीचं भरभरून कौतुक केलं आहे…..

नगरच्या एका छोट्या गावातून निघून थेट युरोपच्या सर्वोच्च संसदेत जाऊन, घराणेशाहीच्या छायेतून बाहेर पडून, स्वतःचं साम्राज्य कसं उभं करायचं, याचं हे एक जिवंत आणि धगधगतं उदाहरण आहे. नाद करा, पण आमच्या मराठी लेकीचा कुठं…

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts