PM Narendra Modi On TMC | पश्मिच बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections) पहिल्या टप्प्यात भरघोस असे मतदान झाले आहे. तर पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानामुळे भाजपच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तृणमूल काँग्रेसवर (TMC) निशाणा साधत भाजपच्या (BJP) विजयाची गर्जना केली आहे.
हेही वाचा – मोजतबा खामेनेईंची शस्त्रक्रिया, चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी? नेमके कुठे आणि कसे आहेत?
भाजपच्या विजयाचे रणशिंग वाजले? पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?
गुरुवारी पश्चिम बंगालमधील 152 जागांवर पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. यादरम्यान एकूण ९२ टक्के मतदारांनी आपले मत नोंदवले. यानंतर बंगालमध्ये भाजपने विजयाची गर्जना केली जात आहे. अशातच आता दमदम येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बऱ्याच काळापासून बंगालमध्ये दिसत असलेल्या बदलाच्या लाटेवर कालच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाने शिक्कामोर्तब केले आहे. काल भाजपच्या बाजूने दाखवलेल्या पाठिंब्याने भाजपच्या विजयाचे रणशिंग वाजले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, टीएमसीने बंगालमध्ये जिथे लोकशाहीचे मंदिर चिरडले होते. आपल्या हुकूमशाहीने ते उद्ध्वस्त केले होते. त्याच बंगालमध्ये जनतेने पहिल्या टप्प्यात लोकशाहीचे मंदिर पुन्हा उभारले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातही तुम्हाला या लोकशाहीच्या मंदिरावर विजयाचा झेंडा फडकवायचा आहे, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी टीएमसीवर साधला निशाणा
टीएमसीवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता टीएमसी खूप अस्वस्थ झाली आहे. काल रात्रभर टीएमसी आपल्या गुंडांना मैदानात उतरण्यासाठी बळ देत होती. मला बंगालच्या जनतेला आणि सर्व भाजप कार्यकर्त्यांना सांगायचे आहे की, विसरू नका ही क्रांतीची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे. विसरू नका की प्रत्येक विझणारा दिवा थोडा फडफडतो. त्याचप्रमाणे टीएमसीचा दिवासुद्धा विझण्यापूर्वी थोडा फडफडत आहे. 4 मे रोजी निकाल जाहीर लागल्यावर टीएमसीच्या गुंडांना बंगालमध्ये लपायला जागा मिळणार नाही. त्यांना वाचवणारा कोणीही सापडणार नाही. कालच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाने टीएमसीच्या जंगलराजचा अंत झाल्याची घोषणा केली आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.












