Pawar suspicious death in custody : उल्हासनगरच्या नेवाळी नाका कांडाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. किरकोळ हातगाडीच्या वादातून सुरू झालेली ही घटना थेट न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यूपर्यंत पोहोचली आहे. हिललाईन पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी ऋषिकेश पवार याचा कोठडीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अटकेनंतर आरोपींची धिंड काढणे, पोलिसांकडून कथित मारहाण आणि पैशांची मागणी असे गंभीर आरोप समोर येत आहेत. मृत ऋषिकेश हा कुटुंबातील एकमेव कमावता होता. मागे आई, पत्नी आणि अडीच महिन्यांची चिमुकली मुलगी. “आम्हाला न्याय हवा,” असा आक्रोश कुटुंबीय करत आहेत. मात्र परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण, नेवाळी नाका कांडाचं खरं सत्य काय, याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
वडिलांवर जीवघेणा हल्ला चढवला
नेवाळी नाका येथे 19 एप्रिल रोजी हातगाडी विक्रेत्याला झालेल्या मारहाणीतून सुरू झालेल्या वादाने आता गंभीर रूप धारण केले आहे. विशाल जाधव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वादातून भावेश भोईर याला मारहाण झाली. त्याचा राग मनात ठेवून त्याच रात्री भावेश भोईर, प्रमोद भोईर, भगवती यादव, ऋषिकेश पवार आणि त्यांच्या साथीदारांनी विशाल जाधव व त्यांच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला चढवला.
पोलिसांकडून मारहाण आणि पैशांची मागणी
हिललाईन पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही आरोपींना अटक केली. मात्र इथूनच प्रकरणाला वादग्रस्त वळण मिळाले. अटकेनंतर आरोपींची परिसरात धिंड काढण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांकडून शिवीगाळ झाल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून कथित मारहाण आणि पैशांची मागणी झाल्याचेही गंभीर आरोप आरोपींच्या कुटुंबीयांनी केले आहेत.
ऋषिकेश पवार याचा संशयास्पद मृत्यू
या दरम्यान सर्वात मोठा धक्का बसला. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी ऋषिकेश पवार याचा संशयास्पद मृत्यू झाला. आजारपण, आत्महत्या की काही वेगळंच कारण, मृत्यूचं गूढ कायम आहे. संशयाची सुई थेट पोलिसांकडे वळली आहे. मृत ऋषिकेश पवार हा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि अवघ्या अडीच महिन्यांची चिमुकली मुलगी आहे. “माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे,” असा टाहो त्याची आई फोडत आहे.
पोलिसांचा माध्यमांना माहिती देण्यास नकार
या संपूर्ण प्रकरणावर उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “चौकशी सुरू आहे,” एवढेच त्यांनी सांगितले. कोठडीतील मृत्यूची न्याय दंडाधिकारी चौकशी सुरू आहे. मात्र पोलीस कोठडीतील मृत्यू, धिंड काढणे, मारहाण व खंडणीचे आरोप यामुळे हिललाईन पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेवाळी नाका कांडाचे खरे सत्य समोर येण्याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.











