मुंबई Today Share Market : गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारात अत्यंत अस्थिर व्यवहार दिसून आले. सुरुवातीच्या तेजीनंतर, गुंतवणूकदार सावध झाल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरले. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे बाजारातील भावनांवर दबाव आला.
हेही वाचा : पवारचा कोठडीतच संशयास्पद मृत्यू, नेवाळी नाका कांडाला धक्कादायक वळण
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण :
30-शेअर असलेला बीएसई सेन्सेक्स 114 अंकांनी घसरुन 77,844.52 वर आला. व्यापक एनएसई निफ्टी देखील 4.30 अंकांनी घसरुन 24,326.65 वर व्यवहार करत होता. मागील सत्रात दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी 1.2 टक्क्यांहून अधिक मजबूत वाढ नोंदवली होती, परंतु नफावसुली आणि जागतिक चिंतेमुळं गुरुवारी बाजार दबावाखाली आला.
कोणत्या शेअर्समध्ये घसरण :
सेन्सेक्समधील शेअर्सपैकी, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, टायटन, सन फार्मा आणि आयटीसी हे सर्वाधिक घसरलेल्या कंपन्यांमध्ये होते. दरम्यान, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक आणि टाटा स्टील हे वाढलेल्या कंपन्यांमध्ये होते.
रुपया 23 पैशांनी मजबूत :
गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 23 पैशांनी मजबूत होऊन 94.26 वर बंद झाला. रुपयाने सुरुवातीच्या घसरणीतून सावरत गुरुवारी उच्चांक गाठला. ब्रेंट क्रूड आणि अमेरिकन डॉलर निर्देशांक त्यांच्या उच्चांकावरून खाली आल्यानं रुपया 23 पैशांनी वधारून 94.26 (तात्पुरता) वर बंद झाला. परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात गुंतवणूकदारांची वाढलेली जोखीम घेण्याची प्रवृत्ती आणि अमेरिका व इराण यांच्यातील शांततेच्या आशेमुळे ब्रेंट तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली घसरल्या.
आंतरराष्ट्रीय चलन बाजारात मोठी चढ-उतार :
आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपयामध्ये मोठी चढ-उतार दिसून आली. तो अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 94.77 वर उघडला, जो त्याच्या मागील बंद भावापेक्षा 28 पैशांनी कमी होता. दिवसभरातील व्यवहारात, USD/INR जोडीने अमेरिकन चलनासमोर 94.90 चा नीचांक आणि 94.08 चा उच्चांक गाठला. रुपया अखेर आदल्या दिवसाच्या बंद भावापेक्षा 23 पैशांनी वधारून 94.26 (तात्पुरता) अंकांवर बंद झाला. बुधवारी, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 69 पैशांनी मजबूत होऊन 94.49 वर बंद झाला होता.











