Weather Update Maharashtra : सध्या राज्यातील अनेक भागांत सूर्याने चाळीशी पार करून सेंच्युरीकडे वाटचाल सुरू केली आहे. घामाच्या धारा, अंगाची लाहीलाही आणि डोक्यावर तळपणारा सूर्य यामुळे सर्वसामान्यांची अवस्था नाकी नऊ आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, उष्माघाताचा धोका वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असून, नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे वरुण राजाची इनिंग संपली, आता सूर्यदेवची ‘बॅटिंग’ सुरू झाली असं म्हणण्याची वेळ आलीय.
उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामाच्या वाटे मोठ्या प्रमाणात बाहेर जाते. यामुळे थकवा, चक्कर येणे आणि स्नायूंमध्ये गोळे येणे यांसारखे प्रकार घडतात. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असते. घामावाटे शरीरातील क्षार आणि पाणी बाहेर पडल्यामुळे डिहायड्रेशन होते. तहान लागण्याची वाट न पाहता दर 20 ते 30 मिनिटांनी थोडे थोडे पाणी प्यावे. दिवसाला किमान 4 लिटर पाणी पिण्याचे लक्ष्य ठेवा. साखरेच्या कोल्ड ड्रिंक्सपेक्षा घरगुती ताक, लिंबू सरबत, शहाळ्याचे पाणी, वाळ्याचे सरबत आणि आमसूल पन्हे या पेयांचा आहारात समावेश करा. यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो. शरीर म्हणजे एक इंजिन आहे आणि पाणी त्याचे कुलंट इंजिन गरम होऊ द्यायचं नसेल, तर दर अर्ध्या तासाला पाण्याचे घोट घेत राहा. नुसतं पाणी नको वाटत असेल, तर त्यात पुदिना, लिंबू किंवा काकडीचे काप टाका आणि बनवा तुमचं स्वतःचं डिटॉक्स वॉटर. कोला आणि सोडा पिऊन तहान भागवण्याचा प्रयत्न म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे, हे विसरू नका.
दिवसातून किमान १२ ते १५ ग्लास पाणी आवश्यक
उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामाच्या वाटे मोठ्या प्रमाणात बाहेर जाते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे ही सर्वात मोठी समस्या असते. यामुळे थकवा, चक्कर येणे आणि स्नायूंमध्ये गोळे येणे यांसारखे प्रकार घडतात. तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी प्या. दिवसातून किमान १२ ते १५ ग्लास पाणी शरीरात जाणे आवश्यक आहे. घरगुती सरबत, कोकम सरबत आणि पन्हे या नैसर्गिक पेयांचा समावेश करा. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण संतुलित राहते.
टरबूज, खरबूज, काकडी, संत्री, द्राक्षे अशी फळे खा
उष्णतेच्या काळात पचनशक्ती कमकुवत होते, त्यामुळे चुकीचा आहार आजारपणाला आमंत्रण देऊ शकतो. पचनशक्ती मंदावते. त्यामुळे मसालेदार, तेलकट आणि जड अन्न टाळावे. पचायला हलके आणि ताजे अन्न खावे. ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे . उदा. टरबूज, खरबूज, काकडी, संत्री, द्राक्षे अशा फळांचा आहारात समावेश करा. पालेभाज्या आणि दुधी भोपळा, पडवळ यांसारख्या भाज्या शरीराला थंडावा देतात. पचायला हलके आणि ताजे अन्न खावे. उन्हाळ्यात तुमची पचनशक्ती सुट्टीवर गेल्यासारखी वागते. त्यामुळे दुपारी जड जेवण करून कुंभकर्ण होऊ नका. थोडक्यात उन्हाळ्यात लाईट खा, लाईट राहा. उन्हातून आल्याबरोबर लगेच फ्रीजमधील अतिशय थंड पाणी पिऊ नये; यामुळे घसा खराब होऊ शकतो किंवा ताप येऊ शकतो.
उन्हाळ्यातील कपड्यांची निवड तुमची त्वचा सुरक्षित ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात घाम शोषून घेणारे पांढरे किंवा फिकट रंगाचे सुती कपडे वापरावेत. गडद रंगाचे आणि सिंथेटिक कपडे उष्णता शोषून घेतात, ज्यामुळे जास्त गरम होते. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी चांगल्या गुणवत्तेचा गॉगल वापरा. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आणि घामामुळे होणारे त्वचेचे संसर्ग टाळण्यासाठी सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट किंवा साध्या पाण्याने अंघोळ करा.
उन्हात हिरोगिरी करणं उष्माघाताला निमंत्रण
घराबाहेर पडण्यापूर्वी २० मिनिटे आधी चेहऱ्यावर आणि उघड्या त्वचेवर किमान SPF 30 असलेले सनस्क्रीन लावावे. त्वचा कोरडी पडू नये म्हणून आंघोळीनंतर हलके मॉइश्चरायझर लावावे. उन्हामुळे केस विस्कळीत आणि कोरडे होतात. बाहेर जाताना केस स्कार्फने झाकून घ्यावेत. दुपारी १२ ते ४ ही वेळ सूर्याच्या पीक अवरची असते. या काळात सूर्यदेव कोणालाही सोडत नाहीत. त्यामुळे शक्य असल्यास महत्त्वाची कामं सकाळी 10 च्या आत उरका किंवा संध्याकाळी 5 नंतर करायला घ्या. उन्हात उगाच हिरोगिरी करणं उष्माघाताला निमंत्रण देऊ शकतं. जड श्रमाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यावर करावीत.
उष्माघात ही अत्यंत गंभीर स्थिती
उन्हाळ्यातील सर्वात मोठा धोका म्हणजे उष्माघात. शरीराचे तापमान नियंत्रित न राहिल्यामुळे ही स्थिती ओढवते. तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे, अंगाला घाम न येता त्वचा कोरडी आणि लाल होणे, धाप लागणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत. अश्या घटना घडताच तत्काळ दवाखान्यात जा. उष्माघात ही अत्यंत गंभीर स्थिती आहे. उष्माघात झालेल्या व्यक्तीला तातडीने थंड ठिकाणी हलवावे, डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याचे पाणी पिणे किंवा चंदनाचा लेप लावणे फायदेशीर ठरते. उन्हातून आल्याबरोबर लगेच फ्रीजमधील अतिशय थंड पाणी पिऊ नये; यामुळे घसा खराब होऊ शकतो किंवा ताप येऊ शकतो.
दुपारच्या वेळी लहान मुलांना मैदानावर खेळायला पाठवू नका
लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींना उष्णतेचा त्रास लवकर जाणवतो. त्यांना दुपारच्या वेळी मैदानावर खेळायला पाठवू नका. घरातील पाळीव प्राण्यांनाही सावलीत बांधा आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करा. वृद्धांना सतत पाणी पिण्यास प्रोत्साहित करा आणि त्यांच्या खोलीत हवा खेळती राहील याची खात्री करा.घरात थंड हवा हवी असेल, तर खिडक्यांना दुपारी जाड पडदे लावा. मातीच्या रांजणातलं पाणी प्यायला सुरुवात करा, फ्रीजच्या अतिथंड पाण्यापेक्षा माठातलं पाणी आरोग्यासाठी नंबर वन आहे.
वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि आरोग्याशी संबंधित कोणतीही तक्रार जाणवल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.उन्हाळ्यात आरोग्याकडे केलेले थोडेसे दुर्लक्षही महागात पडू शकते. उन्हाळा ऋतू आनंददायी करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हाही चांगला या उक्तीप्रमाणे, योग्य आहार, पुरेसे पाणी आणि उन्हापासून संरक्षण या त्रिसूत्रीचा वापर केल्यास आपण उन्हाळ्यातील आजारांपासून दूर राहू शकतो. सूर्यदेवाची पॉवर वाढली असली तरी, आपण आपल्या सावधगिरीने त्यांना हरवू शकतो. चला तर मग, लिंबू सरबताचा ग्लास हातात घ्या आणि म्हणा-उन्हाळा आहे, पण मी कूल आहे.












