CM Thalapathy Vijay | तामिळनाडूचे (Tamil Nadu) नवनियुक्त मुख्यमंत्री जोसेफ विजय (CM Joseph Vijay) हे आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विजय थलपती यांनी राज्यात कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. दारूच्या दुकानांबाबत मुख्यमंत्री विजय थलपती यांनी कठोर निर्देश दिले आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या या निर्णयाची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.
हेही वाचा – परदेशात लग्न करताय, भारतात जागा नाही का? डेस्टिनेशन वेडिंगवर PM मोदींचा थेट सवाल
मुख्यमंत्री विजय यांनी दारूच्या दुकानांवर नेमकी काय केली कारवाई?
मुख्यमंत्री विजय यांनी दारुच्या दुकानांवर कठोर कारवाई केली आहे. राज्यातील प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था आणि बसस्थानकांच्या परिसरात असलेल्या दुकानांची तपासणी आणि ओळख पटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या भागांमधील दारूची दुकाने हटवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री विजय यांनी दारूची किरकोळ दुकाने दोन आठवड्यांच्या आत बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था आणि बसस्थानकांच्या 500 मीटरच्या परिसरात असलेल्या दुकानांची तपासणी आणि ओळख पटवण्याचे आदेश दिले आहेत. तर या आदेशानुसार, या श्रेणीत 717 किरकोळ दारूची दुकाने कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये प्रार्थनास्थळांजवळील 276, शैक्षणिक संस्थांजवळील 186 आणि बसस्थानकांजवळील 255 दुकानांचा समावेश आहे.
तामिळनाडू राज्य वाणिज्य आणि उद्योग मंडळ (TASMAC) सध्या 4,765 किरकोळ दारूची दुकाने चालवते. तर यापैकी प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था आणि बस स्थानकांच्या 500 मीटरच्या परिसरात असलेली 717 दुकाने बंद केली जाणार आहेत.
दरम्यान, 23 एप्रिल रोजी तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने 108 जागा जिंकल्या. पण राज्यात बहुमत मिळवण्यासाठी 118 जागांची आवश्यकता होती. नंतर काँग्रेस, आययूएमएल, व्हीसीके, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) यांनी विजय यांना पाठिंबा दिला. यामुळे विजय यांना १२० आमदारांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांच्या पक्षाला सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले.












