Odisha Food Poisoning Case | कलिंगड (Watermelon) खाणं हे धोकादायक ठरताना दिसत आहे. कारण मागील काही दिवसांमध्ये काही अशा घटना घडल्या आहेत ज्यामध्ये कलिंगड खाल्ल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे. ओडिशातील (Odisha) केंद्रपाडा जिल्ह्यातील पट्टामुंडई ब्लॉकच्या कुपुनी गावात एका कुटुंबाला कलिंगड खाणं महागात पडलं आहे.
हेही वाचा – रोहित पवार भाजपच्या वाटेवर? स्वत:च केलं स्पष्ट, म्हणाले, “भाजपमध्ये जाण्यासाठी मी खूप आधीच…”
कलिंगड खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक
कुपुनी गावात कलिंगड खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याच कुटुंबातील एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण ओडिशामध्ये एकच खळबळ उडाली असून कुपुनी गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुपुनी गावातील एका कुटुंबानी रात्री जेवण झाल्यानंतर कलिंगड खाल्लं. त्यानंतर सकाळी घरातील सर्व सदस्यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. कलिंगड खाणं इतकं महागात पडेल, असं या कुटुंबाला वाटलंही नव्हती. तर अचानक कुटुंबातील 6 जण गंभीर आजारी पडले आणि त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना तातडीनं केंद्रपाडा जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात. यामध्ये उपाचारादरम्यान स्वाधीन सेनापती या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सध्या तिघांवर उपचार सुरू असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्री सर्वांनी कलिंगड खाल्लं आणि सर्वजण झोपले. त्यानंतर सकाळी मुलं ट्यूशनवरून घरी परत आली तेव्हा त्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर सर्वांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान, संबंधित कुटुंबाची प्रकृती बिघडण्याबाबत केंद्रपाडा जिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं की, सर्व रूग्णांमध्ये जुलाब, उलट्या आणि पोटदुखीची लक्षणे दिसून येत आहेत. या रूग्णांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर फूड पॉयझनिंग असल्याचं समोर आलं आहे. तसेच सध्या सर्व रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. तर संबंधित कुटुंबाला कलिंगडमधून फूड पॉयझनिंग झालं की काही दुसरं खाल्ल्याने झालं याचा पोलीस शोध घेत आहेत.










