Bomb Explosion In Pakistan’s Quetta | पाकिस्तामध्ये (Pakistan) मोठा स्फोट (Explosion) झाला असल्याची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे मार्गावर भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटाने संपूर्ण पाकिस्तान हादरले आहे. तर या स्फोटात किमान 20 जण जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा – संजय गायकवाडांना धमकी देणं पडलं महागात; न्यायालयानं दिला थेट दणका, नेमकं प्रकरण काय?
पाकिस्तानच्या क्वेटामध्ये भीषण स्फोट, नेमकं घडलं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट क्वेटामधील (Quetta) चमन फाटक रेल्वे स्टेशनजवळ झाला आहे. या स्फोटात 20 लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या घटनेत एका ट्रेनचे मोठे नुकसान झाले असून जवळच पार्क केलेल्या काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. तर हा स्फोट एवढा भीषण होता की त्याच्या तीव्रतेमुळे आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्या आणि काचेचे फलक फुटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या भीषण स्फोटासंदर्भात पाकिस्तान रेल्वेकडून एक निवेदन आले आहे. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये पाकिस्तान रेल्वेने म्हटले आहे की, “रेल्वेमंत्री क्वेटा स्फोटाचा तीव्र शब्दांत निषेध करतात. ही घटना भ्याड दहशतवादाचे कृत्य आहे. असे हल्ले राष्ट्रीय निर्धार कमकुवत करू शकत नाहीत. क्वेटा कॅन्टहून येणाऱ्या शटल ट्रेनला चमन गेटजवळ स्फोटाचा फटका बसला. तर सध्या मदतकार्यासाठी घटनास्थळी बचाव पथके आणि मदत वाहने पाठवण्यात आली आहेत.”
दरम्यान, या दुर्घटनेनंतर क्वेट्टा येथील सरकारी रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून परिस्थिती हाताळण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस क्वेट्टा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली आहे.












