Twisha Sharama Death Case | मॉडेल ट्विशा शर्माच्या मृत्य प्रकरणाने (Twisha Sharma Death Case) संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. ट्विशा शर्मा ही भोपाळमधील (Bhopal) तिच्या सासरच्या घरी संशयास्पद मृतावस्थेत आढळली होती. त्यानंतर ट्विशाच्या कुटुंबियांनी ट्विशाचा पती समर्थ सिंह (Samarth Singh) आणि सासू गिरीबाला सिंह (Giribala Singh) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच समर्थ सिंहला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे. सोबतच गिरीबाला सिंह यांची देखील चौकशी केली जात आहे. अशातच आता या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) हाती घेतली आहेत.
हेही वाचा – “AI वर बकरीचा बळी द्या अन्….”; बकरी ईदपूर्वी नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य, राजकारण तापलं
ट्विशाच्या शर्माच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार, पथक भोपाळमध्ये पोहोचले
सीबीआयने एफआयआर दाखल करत भोपाळमधील ट्विशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. भोपाळमधील कटारा हिल्स पोलीस स्थानकात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे सीबीआयने तपास सुरू करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी सीबीआयचे पथक भोपाळमध्ये दाखल झाले आहे. तर आता या प्रकरणाचा तपास दिल्लीत तैनात असलेले सीबीआय एसपी राजबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मध्य प्रदेश सरकारने दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायद्याच्या कलम 6 अंतर्गत संमती दिली आणि हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित केले आहे. त्यामुळे आता सीबीआय या प्रकरणात हुंडाबळी, मानसिक छळ, कट आणि इतर संभाव्य गुन्ह्यांचा तपास करणार आहे. दुसरीकडे, एसआयटीने आरोपी समर्थ सिंहच्या घरी गुन्ह्याच्या घटनास्थळाची पुनर्रचना देखील केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आला आहे.
दरम्यान, ट्विशा शर्मा हीचे 9 डिसेंबर 2025 रोजी वकील असलेल्या समर्थ सिंहसोबत लग्न झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतरच सासरच्या लोकांनी ट्विशाचा हुंड्यावरून छळ करण्यास सुरूवात केली होती. तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, अशी तक्रार ट्विशाच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकात दाखल केली आहे. तर पोलिसांनी ट्विशाच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार समर्थ सिहं आणि गिरीबाला यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सध्या या दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे.











