Top News

दाभोलकर हत्या प्रकरणातील 2 दोषींना जामीन; शिंदे पुलावर काय घडलं?

Dr Narendra Dabholkar Case
3

Dr Narendra Dabholkar Case : अंधश्रद्धेविरूद्धचा बुलंद आवाज नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या होते, ‘आम्ही सारे दाभोलकर,’ म्हणत हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारवर दबावापोटी पोलिसांना तपास करण्याचे आदेश देते आधी पुणे पोलिस मग CBI या घटनेचा तपास करते, आरोपींना अटक होते, 9 वर्षांनी विशेष न्यायालयात खटला सुरू होतो, 5 आरोपींविरूद्ध आरोपनिश्चिती होते, साक्षी – पुरावे तपासले जातात, युक्तिवाद होतो आणि 11 वर्षांनी निकाल लागतो… 3 आरोपी निर्दोष, दोघांना जन्मठेप! पण शिक्षा भोगत असलेल्या दोन्ही आरोपींना दोन वर्षांनी मुंबई हायकोर्टाकडून जामीन मिळतो आणि शिक्षेला स्थगिती मिळते? असं अचानक काय घडतं की दोन दिवसांवर दाभोलकरांचा स्मृतिदिन आला असताना त्यांच्या हत्या प्रकरणी शिक्षा झालेल्या 2 दोषींना 2 वर्षांनी जामीन मिळतो? काय आहे हे नेमकं प्रकरण आणि 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या शिंदे पुलावर काय घडलं होतं? पाहूयात, या घटनेची A To Z स्टोरी… 2 गोळ्या झाडल्या दाभोलकरांवर, 2 वर्षांनी दोन्ही दोषी जामिनावर!शिंदे पुलावर काय घडलं?

20 ऑगस्ट 2013 रोजी शिंदे पुलावर काय घडलं? ( Dr Narendra Dabholkar Case )

तारीख होती 20 ऑगस्ट 2013… ठिकाण होतं पुण्यातला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल! सकाळचे सव्वा सात वाजले असतील. डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमीप्रमाणे शिंदे पुलावर मॉर्निंग वॉकसाठी आले आणि… त्यादिवशी त्यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या दाभोलकरांसोबत कुणीही नव्हतं. 7 वाजून 28 मिनिटांनी शिंदे पुलावर त्यांच्या मागून एक काळी दुचाकी आली. 2 हेल्मेटधारी तरूण आणि चेहरा झाकलेले दुचाकीस्वार! ब्रेक मारून दुचाकी थांबवली गेली. साडेसात वाजले असतील…. दाभोलकरांवर अगदी जवळून पहिली गोळी झाडली गेली… थेट डोक्यात! तोच दुसरी गोळी झाडली गेली… थेट छातीत! दाभोलकर खाली पडले. दुचाकीस्वार पळाले आणि मग पूलावर सुरू झाला एकच आरडा ओरडा आणि रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले नरेंद्र दाभोलकर… हे सर्व काही 4 सेकंदात घडलं आणि अंधश्रद्धेविरोधातला सर्वांत मोठा आवाज कायमचा बंद झाला…

या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोण तर एक सफाई कर्मचारी आणि मॉर्निंग वॉक करणारा एक वॉकर. दाभोलकरांवर गोळ्या झाडताना त्यांनी दूरून पाहिलं, अखेर 11 वर्षांनी या 2 साक्षीदारांचे जबाब पुरावा म्हणून वापरले गेले, 2 आरोपींना जन्मठेप लागली पण पुढं 2 वर्षांनी त्याच 2 साक्षीदारांचे जबाब आरोपींच्या जामिनासाठी वापरले गेले.

हेही वाचा : फडणवीस तीन दिवसच मुख्यमंत्री? मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

11 वर्षांनी न्यायालयाचा निकाल काय लागला?

तब्बल 11 वर्षांनी म्हणजे 10 मे 2024 रोजी या खटल्याचा निकाल लागला. पुण्यातील विशेष न्यायालयानं या खटल्याचा निकाल दिला. 5 पैकी 3 आरोपी म्हणजे वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटले, तर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे दोन आरोपी दोषी आढळले. दोघांना जन्मठेप आणि 5 लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली गेली. मग मात्र हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं आणि दोन वर्षांनी म्हणजे 29 एप्रिल 2026 रोजी शरद कळसकर, तर आज 18 ऑगस्ट 2026 रोजी सचिन अंदुरे यांना याच खटल्यात जामीन मिळाला, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती मिळाली.

20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर राज्यभर संताप उसळला. ‘आम्ही सारे दाभोलकर’ म्हणत अंनिसचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तत्कालीन सरकारवर दबाव आला आणि पुणे पोलिसांनी तपास सुरू केला.

जामीन देताना मुंबई हायकोर्टाने कोणते मुद्दे पाहिले? ( Dr Narendra Dabholkar Case )

जानेवारी 2014 मध्ये या प्रकरणी पहिली अटक झाली. मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल पण पुराव्याआभावी दोघांना जामीन मिळाला. त्यांनी तर भर कोर्टातच एटीएस प्रमुखांवर आरोप केले. तपास संथ गतीनं सुरू असल्याचं म्हणत दाभोलकर कुटुंब मुंबई हायकोर्टात गेलं आणि हायकोर्टानं जून 2014 मध्ये या हत्येचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेत CBI च्या हाती दिला. CBI ने काय केलं? तर CBI नं 10 जून 2016 रोजी डॉ. वीरेंद्र तावडेला अटक करत त्याला या हत्येचा मास्टरमाईंड म्हटलं पण नंतर CBI ची Investigation थेअरीच बदलली. 2018 मध्ये या हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला. गौरी लंकेश प्रकरणात मिळालेल्या माहितीवरून नालासोपाऱ्यात झालेल्या कारवाई दरम्यान पोलिसांच्या हाती लागला शरद कळसकर! चौकशीत त्यानं खळबळजनक कबुली दिली,’मी दाभोलकरांना मारलं. त्याच्या माहितीवरून सचिन अंदुरेला तेव्हाचं औरंगाबाद म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. चौकशीअंती CBI नं म्हटलं, ‘गोळ्या अंदुरे आणि कळसकरनंच झाडल्या.’ पुढं काय घडलं?

26 मे 2019 ला संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला अटक झाली. या दोघांनी शस्त्र नष्ट करण्यास मदत करण्यासोबतच रेकीसुद्धा केली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
अखेर 15 सप्टेंबर 2021 रोजी तब्बल म्हणजे 9 वर्षांनी 5 आरोपींविरोधात हत्या, कट आणि UAPA कलमांतंर्गत आरोप निश्चिती करण्यात आली. या खटल्यात 20 साक्षीदार तपासले गेले त्यातली सफाई कर्मचाऱ्याची साक्ष महत्त्वाची ठरली. ‘अंदुरे आणि कळसकरनंच गोळी मारली, त्यानं कोर्टात सांगितलं. पण उलटतपासणीत उलटं घडलं. तो म्हणाला,’यांना आपण ओळख परेडमध्ये ओळखलं नव्हतं पण पेपरमध्ये फोटो पाहिले होते आणि मग निकालाचा दिवस उजाडला 10 मे 2024.

दोन दोषींना जन्मठेप; दोन वर्षांनी जामीन का मिळाला? ( Dr Dabholkar Murder Case )

5 पैकी 3 आरोपी म्हणजे वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटले, तर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे दोन आरोपी दोषी आढळले. दोघांना जन्मठेप आणि 5 लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली गेली पण या निकालानंतर 2 वर्षांनी या दोन्ही आरोपींना 4 महिन्यांच्या फरकानं मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला. शरद कळसकरला 50 हजारांच्या हमीवर, तर आज 18 ऑगस्ट 2026 रोजी सचिन अंदुरेचाही जामीन झाला. इतकंच नव्हे, तर त्याच्या जन्मठेपेलाही स्थगिती मिळाली. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले या मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठानं हा निकाल दिला. ओळख परेड झालीच नाही आणि साक्षीदारांच्या जबाबात विसंगती हा या जामिनाचा आधार ठरला.

Dr Narendra Dabholkar : डॉ. दाभोलकर म्हणायचे,’ मी देवाला मानत नाही पण माणसाला मानतो.’ भोंदूबाबा, जादूटोणा, नरबळी यांच्याविरूद्ध लढण्यात त्यांनी उभं आयुष्य घालवलं. त्यांचा आवाज दाबण्यासाठीच हा कट रचला गेल्याचा असा आरोप होतोय पण 13 वर्षांनीही त्यांच्या हत्येचा खरा सूत्रधार कोण? आजही हा प्रश्न निरुत्तर!
20 ऑगस्ट 2013, पुण्यातल्या शिंदे पुलावर 2 गोळ्या झाडल्या गेल्या आणि अंधश्रद्धेविरूद्धचा 1 बुलंद आवाज कायमचा बंद झाला. आज 13 वर्षांनी काय परिस्थिती आहे… 5 आरोपी, 3 निर्दोष, 2 दोषी… आणि आता ते दोघेही जामिनावर! आणि आता प्रश्न तुम्हाला? दाभोलकर हत्या प्रकरणाचा पुन्हा नव्यानं तपास व्हायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं?

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts