Fly91 Solapur Flights: सोलापूरकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पावसाळी हंगामात उद्भवणाऱ्या तांत्रिक आणि हवामानाशी संबंधित अडचणींमुळे सोलापूर- गोवा तसेच सोलापूर हैदराबाद या विमानसेवा काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० जूनपासून पुढील तीन महिन्यांसाठी या दोन्ही मार्गावरील उड्डाणे स्थगित राहणार आहेत.
मान्सून काळात कमी दृश्यमानता, वारंवार बदलणारी हवामान परिस्थिती आणि विमानतळावर रात्रीच्या लँडिंगसाठी आवश्यक सुविधांची अभाव यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही खबरदारीचा पावले उचलण्यात आली आहेत.
हेही वाचा: SSC कडून JSA आणि LDC पदांसाठी भरती; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी!
सोलापूर, गोवा आणि हैदराबाद यांना जोडणारी ही विमानसेवा फ्लाय-91 कंपनीकडून चालवली जाते. सेवा सुरू झाल्यापासून सोलापूरसह लातूर, धाराशिव आणि आसपासच्या जिल्ह्यांतील प्रवाशांकडून या मार्गांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्यवसाय, पर्यटन आणि वैयक्तिक प्रवासासाठी या सेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता.
मात्र मागील काही वर्षाच्या अनुभवातून मान्सूनच्या काळात उड्डाणांचे वेळापत्रक वारंवार विस्कळीत होत असल्याचे दिसून आले. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षित उड्डाण संचालन सुनिश्चित करण्यासाठी तात्पुरती सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान परिस्थिती सुधारल्यानंतर ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीपासून ही विमानसेवा पुन्हा नियमितपणे सुरू केली जाईल, अशी माहिती फ्लाय-91 व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही काळ पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे.












