NCP completes 27 years : आज राष्ट्रवादीचा 27 वा वर्धापन दिन. गेली 27 वर्ष राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहे. शरद पवारांनी ज्या राष्ट्रवादीची स्थापना केली ती राष्ट्रवादी अजित पवारांनी फोडली. आता राज्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन गट आपण पाहतो. या राष्ट्रवादीच्या २७ वर्षाच्या जडणघडणीचा इतिहास आज आपण जाणून घेऊ…
सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर शरद पवार, संगमा आणि अन्वर यांनी काँग्रेस पक्षातून 10 जून 1999 रोजी बंड केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. स्थापनेनंतर काही महिन्यांतच महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला काँग्रेसमधून सुरुवात झाली. पण, 1999 मध्ये, राजीव गांधी यांच्याशी असलेले मतभेद आणि राजकीय कोंडीमुळे त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पासून वेगळे होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष बनले. काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री तसेच लोकसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, संरक्षण मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम केलं.
यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करतोय. शरद पवार यांनी आपल्या वयाची 84 वर्षे पूर्ण करून 85व्या वर्षात पदार्पण केलंय. महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६० साली झाली. त्यानंतर दोनच वर्षांत राज्य पातळीवरच्या राजकारणात हळूहळू सक्रीय होत १९६७ मध्ये शरद पवार विधानसभेचे सदस्य झाले. १९७८ साली त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास असा आहे की त्यांना वगळून राज्याच्या राजकारणाविषयी चर्चा होऊ शकत नाही. मग त्यांची राजकीय भूमिका, राजकारण करण्याची पद्धत काहींना आवडते तर काहींना आवडत नाही. त्यांच्या निर्णयांवर चर्चा, वाद-विवाद होतात पण त्यांची नोंद घेणं टाळता येत नाही.
राजकारणात शरद पवार हे एक बहुपेदी व्यक्तिमत्त्व
गेल्या सहा दशकांत राजकारणाचं स्वरूप खूप बदलत गेले असलं तरी पवार आपलं स्थान टिकवून ठेवण्याची किमया आणि नोंद घेण्याची आवश्यकता टिकवून आहेत, ही बाब विलक्षणच म्हटली पाहिजे! देशभरात त्यांच्या वयाचे एखाद-दुसरेच नेते आज राजकीय पटलावर गांभीर्याने दखल घेण्याची किमया टिकवून आहेत. राजकारणात शरद पवार हे एक बहुपेदी व्यक्तिमत्त्व आहे. त्याला विविध कंगोरे आहेत. त्याचा अभ्यास करायला जावं तर गुंतागुंत बरीच आहे, याला कारणीभूत त्यांची विविध रूपं!
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्ष नाव आणि ‘घड्याळ’ चिन्ह दादा गटाकडे
शरद पवारांनी त्यांचा पुतण्या म्हणजेच अजित पवारांना राजकारणात आणलं. पवार काका पुतण्याची जोडी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. काका पुतण्यानं मिळून राष्ट्रवादी पक्षाला भक्कमपणे उभारलं मात्र जुलै २०२३ मध्ये अजित पवारांनी बंड केलं आणि ते महाराष्ट्राच्या एनडीए सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले. यामुळे पक्षात ऐतिहासिक फूट पडली. कायदेशीर लढाईनंतर, भारतीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला अधिकृत ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्ष नाव आणि ‘घड्याळ’ हे चिन्ह दिलं. तर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील मूळ गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार म्हणून मान्यता मिळाली.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कित्येक दशकं पवारांनी महाराष्ट्राच्या शासन आणि समाजात एक चिरस्थायी वारसा विणला. कॉंग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला आव्हान देऊन स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर कर्करोगासारख्या असाध्य आजाराने गाठूनही उभे राहिलेले पवार हे रसायन अजिबातच सामान्य नाही. तरीही, २०१९च्या लोकसभा निवडणुकीने चित्र बदललं. शरद पवार संपल्याच्या चर्चांना उधाण आले. पवारांना सोडून लोक भाजपमध्ये जाऊ लागले. त्याही स्थितीत पवार डगमगले नाहीत. ते बाहेर पडले. ‘इडी’वर चालून गेले. पावसात भिजले. अशक्य ते सगळं पवारांनी करून दाखवलं.












