Gokul Gite announces Nashik MLC Election : नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील निर्माण झालेला पेच अखेर मिटला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेलेल्या या जागेसाठी पक्षाकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भाजपकडून इच्छुक असलेले गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. आता गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेत नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे नरेंद्र दराडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सुरुवातीला भाजपचे गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली. त्यानुसार शिवसेनेकडून विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गणेश गीते यांनी अर्ज मागे घेतला होता. मात्र गोकुळ गीते यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला होता.
शिवसेना शिंदे गटाचा अधिकृत उमेदवार मैदानात
गोकुळ गीते यांच्या बंडखोरीमुळे महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी निर्माण झाली होती. एका बाजूला शिवसेना शिंदे गटाचा अधिकृत उमेदवार मैदानात होता, तर दुसरीकडे महायुतीतीलच घटक पक्षाशी संबंधित असलेल्या गीते यांच्या उमेदवारीमुळे मतविभाजनाची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे नरेंद्र दराडे यांच्या विजयाच्या समीकरणावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
निवडणुकीतून माघार घेत नरेंद्र दराडे यांना पाठिंबा
या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी गोकुळ गीते यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांनी मध्यस्थी करत गीते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आज गणेश गीते यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत गोकुळ गीते यांनी आपली भूमिका स्पष्ट करत निवडणुकीतून माघार घेत नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली.
गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश
गोकुळ गीते यांच्या माघारीमुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीतील महायुतीसमोरील मोठा अडथळा दूर झाला आहे. गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश आल्याचे मानले जात आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी निवडणुकीचा मार्ग काहीसा सुकर झाला असून, महायुतीने संभाव्य मतविभाजनाचा धोका टाळण्यात यश मिळवले आहे.












