Abhijit Deepke: नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर देशभरात आवाज उठवणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढताना दिसत आहे. दिल्लीतील जंतर -मंतर येथे ६ जूनला झालेल्या आंदोलनानंतर आता या मोहिमेचा विस्तार देशातील विविध शहरांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आज १० जून रोजी पुणे येथे पत्रकार परिषदेत घेतली.
दीपके यांनी सांगितले की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला नाही, तर आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढवली जाईल. पुण्यापासून या आंदोलनाच्या पुढील टप्प्याला सुरुवात होणार असून त्यानंतर लखनऊ, बेंगळुरू यांसारख्या शहरांमध्येही आंदोलन छेडले जाणार आहे. तसेच २० जून रोजी पुन्हा दिल्लीतील जंतर- मंतर येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : काऊंटडाऊन सुरू! FIFA World Cup 2026 वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या आवडत्या टीमचे सामने कधी?
आईची चिंता आणि मुलाचा निर्धार
यावेळी बोलताना अभिजित दीपिके यांनी आपल्या कुटूंबाच्या भावना देखील व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, अमेरिकेला जाताना त्यांच्या आई रडली नव्हती, त्यापेक्षा अधिक माझ्या भारतात परत येण्याच्या निर्णयांनी ती रडत होती.
पालकांना केले विशेष आवाहन
देशभरातील पालकांनी आपल्या मुलांना प्रश्न विचारण्यापासून किंवा मत व्यक्त करण्यापासून रोखू नये, असे आवाहन दीपके यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण, परीक्षा आणि सार्वजनिक प्रश्नांवर निर्भीडपणे मत मांडले, तर त्यांचा आवाज दुर्लक्षित करणे कोणालाही शक्य होणार नाही, असे ते म्हणाले.
आता कायम भारतातच
अमेरिकेतून परतल्यानंतर पुन्हा जाणार का, या प्रश्नावर उत्तर देताना दीपके म्हणाले, “आता मी कायमस्वरूपी भारतातच राहणार आहे.” आगामी आंदोलनांमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुण्यात होणाऱ्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर देशव्यापी चर्चा निर्माण होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.









