Millie cat: इंग्लडमधील ३१ वर्षांची ‘मिली’ नावाची पाळीव मांजर सध्या जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. तिचे वय अधिकृतपणे सिद्ध झाल्यास ती जगातील सर्वात वयोवृद्ध जिवंत मांजर ठरू शकते. विशेष म्हणजे, तिच्या दीर्घायुष्यामागे असलेले रहस्य जाणून अनेकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
इंग्लंडमध्येराहणाऱ्या एक पाळीव मांजरीची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. ‘मिली’ नावाच्या या मांजरीचे वय तब्बल ३१ वर्षे असल्याचा दावा तिचे मालक लेस्ली ग्रीनहफ यांनी केला आहे. हा दावा अधिकृतरित्या सिद्ध झाल्यास, मिलीचे नाव जगातील सर्वात वयोवृद्ध जिवंत मांजर म्हणून नोंदवले जाऊ शकते.
तीन दशकांहून अधिकचा प्रवास
लेस्ली यांच्या माहितीनुसार, मिलीचा जन्म १९९५ मध्ये झाला. त्यांची पत्नी पपाउला यांनी ती लहान असतानाच घरी आणली होती. आजही त्यांच्या संग्रहात त्या काळातील एक छायाचित्र जपून ठेवले असून, त्यावरून मिलीच्या वयाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा: आई आजारी असली तरी बाळाला दूध द्यावे का? स्तनपानाबाबत तज्ज्ञांनी सांगितले महत्त्वाची गोष्ट
आहार आणि काळजीवर विशेष भर
मिलीच्या उत्तम आरोग्यामागे नियमित काळजी आणि संतुलित आहार महत्वाचा असल्याचे लेस्टी सांगतात. गेल्या काही वर्षांपासून ती फक्त मिनरल वॉटर पिते. तिच्या आहारात सॅल्मन, चिकन, प्रॉन्स आणि टूना यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ असतात. याशिवाय तिच्यासोबत वेळ घालवणे आणि तिला प्रेम देणे हा तिच्या दैनंदिन दिनक्रमाचाच भाग आहे.
उन्हाळ्यातही विशेष व्यवस्था
वय वाढल्यामुळे मिलीला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून घरात तिच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तिच्या आरामासाठी पंखे सुरू ठेवले जातात, पिण्याच्या पाण्यात बर्फाचे तुकडे टाकले जातात आणि थंड जागी विश्रांती घेण्यासाठी तिला मोकळीक दिली जाते.
पत्नीच्या निधनानंतर झाला भावनिक परिणाम
2020 मध्ये लेस्ली यांच्या पत्नीचे कोविड-19 मुळे निधन झाले. त्यानंतर काही काळ मिलीने अन्न खाणे कमी केले होते. तिच्या आवडीचे पदार्थ देऊन आणि अधिक काळजी घेतल्यानंतर ती पुन्हा पूर्ववत झाली. आता वयामुळे ती शांत स्वभावाची झाली असून बहुतांश वेळ घरातच घालवते.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा प्रयत्न
लेस्ली यांची इच्छा आहे की, मिलीच्या दीर्घायुष्याची अधिकृत नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी. मात्र, तिच्या जन्माची अधिकृत कागदपत्रे नसल्याने हा दावा सिद्ध करणे सोपे नाही. तरीही त्यांच्याकडे असलेले जुने छायाचित्र आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे ते अर्ज करण्याची तयारी करत आहेत.
मिलीची कथा केवळ एका पाळीव प्राण्याच्या दीर्घायुष्याची नाही, तर योग्य आहार, सुरक्षित वातावरण आणि सातत्याने मिळालेल्या प्रेमामुळे प्राण्यांच्या आरोग्यावर किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो, याचाही ती एक प्रेरणादायी नमुना ठरत आहे.




